( राजापूर )
मान्सून पुर्व आणि मान्सून सक्रिय झाल्यापासून आजतागायत दोन महिने राजापूर शहरासह ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. विज चोरी नाही आणि शंभर टक्के विजबिल वसुली असूनही राजापूरवासीयांची पदरी अखंडित विजपुरवठयाबाबत कायमच उपेक्षा का? राजापूरवासीयांना कुणी वाली नाही म्हणून राजापूरातील जनतेची ही अवस्था आहे काय ? असे एक नाहीत अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. शहरासह ग्रामीण भागात गेले दोन महिने अनेक भागात एक दिवस, दोन दिवस तीन दिवस काही भागात त्यापेक्षाही अधिक काळ विजपुरवठा खंडीत आहे. अनेक भागात वादळी वारा व पावसामुळे विज पोल व विजवाहिन्या कोलमडत आहेत. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आपल्या परिने विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्तही करत आहेत. मात्र दरवर्षी पावसाळयात निर्माण होणाऱ्या या विज आणीबाणीला नक्की जबादार कोण? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोणत्याही भागाचा विकास हा त्या भागातील रस्ते, विज, पाणी, आरोग्य व शैक्षणिक सुविधा यावर अवलंबून असतो व त्यावरच त्याचे मोजमाप होते. मात्र राजापूर तालुक्यात या पाचही सुविधांची विदारक अशी अवस्था आहे. त्यामुळे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात काय? हा जनतेचा सवाल आहे. किरकोळ रस्ते, पाखाडया आणि निवेदनांपलिकडे देखील विकास असतो, आपल्या मतदार संघातील जनतेला चांगले रस्ते, पाणीपुरवठा सेवा चांगला विजपुरवठा केला पाहिजे आणि त्यासाठी काहितरी ठोस काम केले पाहिजे हे आमच्या लोकप्रतिनिधींच्या कधी लक्षात येणार असा जनतेचा सवाल आहे. निवडणूका आल्या कि विकासाचा आणि जनतेचा पुळका असल्याचा आव आणणाऱ्यांनी आपण काय करतो व केले याचे आत्मपरिक्षणही करणे आवश्यक आहे.
राजापूर तालुक्यात राजापूर भाग एक व राजापूर भाग दोन अशी महावितरणची कामकाजासाठी दोन विभागात विभागणी केलेली आहे. भाग एक मध्ये राजापूर शहर, राजापूर शहरालगतची काही ग्रामीण भागातील गाव म्हणून राजापूर ग्रामीण, धारतळे व जैतापूर अशा चार विभागांचा समावेश आहे. तर राजापूर भाग दोन मध्ये हातिवले, पाचल, सौंदळ व आडिवरे या चार विभागांचा समावेश आहे. यामध्ये अनेक विजउपकेंद्रांचा समावेश येतो व त्यावर त्या त्या भागातील विजपुरवठा सुरू असतो. या दोन विभागांमध्ये एकूण तालुक्यात सुमारे ५० ते ५५ हजार इतके विजग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना त्या त्या भागात अनेक समस्यांवर मात करत महवितरणकडून विजपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असतो.
मात्र तालुक्यातील एकूणच विजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेबाबत विचार केला तर ती आता अनेक भागात कालबाहय झाल्याचे दीसून येते. जिर्ण झालेले विजपोल व विजवाहिन्या, विज ट्रान्सफरमर, कंडक्टर यांसह आवश्यक असणारे अन्य साहित्य हे आता कालबाहय होत आहेत. अनेक भागात खास करून ग्रामीण भागात ज्यावेळी त्या गावात विजपुरवठा सुरू करण्यात आला तेव्हाचीच यंत्रणा आजही कार्यरत आहे. त्यामुळे कालपरत्वे ती बदलणे आवश्यक असून त्याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही आणि त्यामुळेच आज पावसात जनतेला विजेअभावी दिवस काढावे लागत आहेत.
वारंवार खंडीत होणाऱ्या या विजपुरवठयामुळे पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला असून ऐन पावसाळयात अनेक गाव वाडयांमध्ये पाणी नाही अशी अवस्था आहे. तर अनेकांच्या घरातील महागडी अशी विजउपकरणे नादुरूस्त होत आहेत. कारण काही वेळा एक मिनिट देखील विज टिकत नाही अशी अवस्था आहे. पावसाळयापुर्वीची दुरूस्तीची कामे पुर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरण दरवर्षी करते पण प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाल्यावर विजेचा जो खेळखंडोबा सुरू होतो तेव्हा ती कामे कशी तकलादु होती हे लक्षात येते. महावितकरणकडुन देखील आहे त्यात चालवून नेण्याचे कामचलावू धोरण ग्राहकांना मारक ठरत आहेत. महीनाभरापुर्वी राजापुरात विजसमस्येबाबत सर्वक्षियांनी एकत्रित येऊन महावितरणवर धडकही दिली. पण त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
राजापूर तालुक्यात एकही विजचोरीची घटना नाही, विजबिल वसुलीतही तालुका अव्वल आहे मग राजापूरात ही अवस्था का असा ग्राहकांचा सवाल आहे. विजबिल आकारताना वहन भार, इंधभार असे अनेक कर आकारून बिल काढले जाते, ग्राहकही कोणतीही तक्रार न करता ते भरतात, मग अशा ग्राहकांना अखंडीत विजपुरवठा करण्याची महावितरणची जबाबदारी नाही काय?असाही ग्राहकांचा सवाल आहे.
लोकप्रतिनिधींची उदासिनताही याला कारणीभूत आहे, त्याचबरोबर जनतेचा सुस्तपणाही कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी काय केले याचा लेखा जोखा जनतेने मागितला पाहिजे. महावितरणशी संबधीत अनेक समस्या असताना त्या सोडविल्या का जात नाहीत याचा जाब जनतेने लोकप्रतिनिधींना विचारला पाहीजे पण तसे होताना दिसत नाही आणि मग त्यामुळेच अशा समस्यांना तोंड दयावे लागते.
राजापूर तालुक्यातील आज सर्वात गंभीर अशी विजपुरवठयाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. केवळ बैठका आणि निवेदनांचा फार्स नको तर कृती हवी आणि त्यातुन सुधारणा हवी तरच ग्राहकांना दिलासा मिळेल. यासाठी आता ग्राहकांनीच संघटीत होऊन पुढाकार घेतला पाहिजे तरच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल. नाहीतर राजापूरकरांची अवस्था नेहमिची येतो मग पावसाळा अशी होईल.
राजकिय पुढाऱ्यांनी विजसमस्येबाबत तत्परता दाखवावी
गतसप्ताहात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शिवणेबुद्रुक शाळेच्या इमारतीवर झाड कोसळुन शाळेच्या इमरतीचे नुकसान झाले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र त्यानंतर या शाळेच्या इमातीच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व त्याचे फोटो सोशल मिडायायवर टाकण्यासाठी राजकिय पक्षांमध्ये जणू चढाओढ लागली होती. शिवसेना, उ. बा. ठा. भाजपा, राष्ट्रवादी या साऱ्याच पक्षांच्या पुढाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत धाव घेतली. पालकमंत्र्यांनी तर तात्काळ २५ लाखाचा निधीही मंजूर केला. निश्चितच ही आनंदाची बाब आहे. मात्र हीच तत्परता या राजकिय पक्षाच्या पुढाऱ्यांनी गेले दोन महिने तालुक्यात सुरू असलेल्या विज समस्येबाबतही दाखवावी म्हणजे जनतेची या विजेच्या अंधारातुन सुटका होईल. निवडून जवळ आल्याने श्रेयासाठी सुरू असलेली ही चढाओढ राजापूरवासीय नक्कीच जाणतात.
अनेकांना आजही नाणारचे माजी सरपंच कै. तात्या पेडणेकर यांची आठवण येते
आपल्या गावातील समस्यांबाबत आणि खास करून विजसमस्यांबाबत लोकप्रतिनिधी कसा जागरूक असावा हे नाणारचे माजी सरपंच कै. तात्या पेडणेकर यांचे त्यावेळी होणाऱ्या आमसभेतील रौद्र रूप पाहिल्यावर लक्षात यायचे. आमसभेत प्रसंगी अध्यक्षस्थानी असलेल्या मतदार संघाच्या आमदारांनाही त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागे, मात्र अत्यंत आक्रमकणे ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या भागातील गंजलेले पोल, विजवाहिन्या व अन्य समस्या मांडत व त्या सोडवून घेत, त्यामुळे नाणार परिसरात जे पोल व विजवाहिण्या बदलण्याचे काम झाले ते कै. तात्यांमुळेच अशी आजही अनेक जण आठवण काढतात.
महावितरणचे वारा व पाऊस हे एकच पालुपद
राजापूरात गेल्या दोन महिन्यात एखाद्या गावात वा वाडीत अखंडीतपणे विजपुरवठा सुरू राहिला असे एकही उदाहरण नाही, वारंवार विज गायब होत आहे. मात्र महावितरणकडून याचा सारा दोष वारा व पावसावर टाकला जात आहे, वादळी वारा व पावसामुळे विजपुरवठा खंडीत होतो. वारंवार लाईनवर अडचणी निर्माण होतात असेच सांगितले जाते. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन केले पाहिजे, उपलब्ध साधन सामुग्रीतही आपण ग्राहकांना कशा प्रकारे सुरळीत विजपुरवठा करू यासाठी प्रयत्न् केले पाहिजेत मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे राजापूरकरांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.