( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुक्यातील कडवई साळवीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत कोसळून एक वर्ष झाले तरी देखील संबंधित विभागाने याकडे दुर्लक्षित केले. यावरून आता ग्रामस्थांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
शाळेत पक्की इमारत, शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, क्रिडांगण, तसेच संरक्षक भिंत आदी भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा आजही सुविधांपासून वंचित असल्याचे अशा घटनांमधून उघड झाले आहे.
सदर शाळेच्या इमारतीपासून तीन ते चार फूट अंतर राहिले आहे. वेळेत भिंतीचे काम न केल्यास इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळेची भिंत कोसळली. या घटनेला एक वर्ष उलटले तरी देखील नवी भिंत उभारली गेली नाही. तसेच भिंत उभारण्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याचे चित्र आहे. शाळेच्या कंपाऊंड वॉल संदर्भात आयुक्त कार्यालयातून सक्त आदेश आहेत. तरीही आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गटशिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा करीत सदरचे काम तातडीने म. रां.रो. ह. योजनेमध्ये घेण्याची विनंती केली होती. तसेच तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेमधून त्याला मंजुरी मिळावी. परंतु गटशिक्षण अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित विभाग विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळत आहे. भिंत उभारण्याबाबत तत्काळ जर पाठपुरावा केला नाही तर १५ ऑगस्ट रोजी पालक, विद्यार्थी, आणि ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कडवई ग्रामपंचायत माजी सरपंच वसंत उजगावकर यांनी दिला आहे.