(रत्नागिरी)
तालुक्यातील करबुडे येथे तोंडी करार केलेल्या घर खरेदीच्या एकूण रकमेपैकी ५० हजार देऊन घरात राहणाऱ्या कुटुंबाला चारजणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीची ही घटना गुरुवार २५ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
मनोहर भगवान जाधव, मनोहर जाधवची पत्नी, प्रतीक मनोहर जाधव आणि अन्य एक अज्ञात मुलगा (सर्व रा. करबुडे धनावडेवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अभिषेक सहदेव पवार (रा. करबुडे धनावडे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि आरोपींमध्ये घर विकत घेण्याबाबत तोंडी करार झाला होता. एकूण रकमेपैकी ५० हजार रुपये संशयितांना फिर्यादींनी देउन एक महिन्यांपूर्वी ते आपल्या कुटुंबासह त्या घरात रहाण्यासाठी आले होते.
दरम्यान, दि. २५ जुलै रोजी चारही संशयितांनी त्या घरी येऊन तू आताचे आता घर खाली कर, असे बोलत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबासह वाद घालण्यास सुरुवात केली. त्या नंतर मनोहर जाधवने अभिषेक पवार यांच्या डोक्यात लोखंडी पकडीने कानावर मारुन दुखापत केली. त्यावेळी फिर्यादीची आई, पत्नी त्यांचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला गेल्या असता संशयिताने त्यांना पक्कड आणि घरातील पाळणा उगारत मारहाण केली. त्या नंतर संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३२४, (४) (५), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.