जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा प्रपंचवृक्ष वाढला. वाढता वाढता विस्तीर्ण झाला. फळे आल्यावर विश्रांती पावला. नाना रसाळ फळे लागली. नाना जिन्नस गोडीला आली. गोडी पाहण्यासाठी नाना शरीर निर्माण केली. उत्तम विषय निर्माण झाले. ते शरीराशिवाय भोगता येत नाहीत म्हणून नाना शरीर निर्माण करून उपाय निर्मिला. नाना इंद्रिय निर्माण केली. भिन्न भिन्न गुणांची निर्मिती केली. एका शरीराला आहेत पण त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. श्रोत्र म्हणजे कानांवर शब्द पडला त्याचा भेद कळला पाहिजे, असा उपाय केला. त्वचा इंद्रियाला शीतोष्ण भासते. चक्षु म्हणजे डोळ्यांना सगळे दिसतं. इंद्रियांमध्ये असे वेगवेगळे गुण आहेत.
जिभेद्वारे रस चाखणे, नाकांद्वारे वास घेणे, असे इंद्रियांत वेगवेगळ्या गुणांचे भेद केलेले आहेत. वायू पंचक, अंतकरण पंचक यांच्यात मिसळून निशंकपणे ज्ञानेंद्रीये, आणि कर्मेंद्रिये सगळीकडे फिरतात हे सावकाश पहा. कर्मेंद्रियांच्या मदतीने जीव विषय भोगतो. असा उपाय ईश्वराने केला. जगामध्ये चांगले विषय निर्माण झाले ते शरीर नसल्यास कसे भोगायचे? म्हणून नाना शरीरांची निर्मिती केली. अस्थिमांसाचे शरीर आहे त्याच्यामध्ये देखील विविध गुणांचे प्रकार आहेत.
शरीरासारखं दुसरं यंत्र नाही. अशी शरीरे निर्माण केली. विषयभोगाने वाढविली. त्यातून लहान थोर निर्माण झाले. अशाप्रकारे विवेकाने विचार करून योग्य शरीरात योग्य गुण ठेऊन अस्थी मासाची शरीरे जगदीश्वराने निर्माण केली. अस्थीमासाच्या पुतळ्यात जाणीव एकच असली तरी शरीरभेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात. हा भेद कार्यसापेक्ष असतो. कार्याच्या दृष्टीने तो अतिउपयोगी आहे. सर्वसृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळी कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला आहे, तो खरा नाही. सृष्टीच्या रूपाने पाहिले तर भेद दिसतो, ब्रह्मत्वदृष्टीने तो खरा नव्हे. भेदाभेद हा संवाद मायेच्या गुणांमुळे आहे.
अंतरात्म्याचा महिमा मायेमुळे कळत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मा देखील संभ्रमात पडतो अशी कथा पुराणात आलेली आहे. पिळ, पेच, वादविवाद,घडोघडी तीक्ष्ण तर्क यांच्याद्वारे त्याचे विवरण करताना मनाची त्रेधातिरपिट उडते. मी पणाचे भान असताना सगळे काही लागते, निरंजन अवस्थेत काहीच नसते हे एकांतकाळी समजून घेतलेले बरे. देहाच्या सामर्थ्यानुसार सगळे जगदेश्वर करतो, त्याला थोर समर्थ अवतार असे म्हणतात. शेष, कूर्म, वराह असे देह विशालाने धरले, त्यामुळे सकलसृष्टीची रचना चालते. ईश्वराने केवढे मोठे सूत्र केले, सूर्याला धावायला लावलं, ढगांना अगाध पाणी धरायला लावले. पर्वतासारखे ढग वर येतात, सूर्यबिंबाला आच्छादतात, त्यासोबतच वायूची गती प्रकट होते. काळाचा सेवक असल्याप्रमाणे वारा धावतो. ढगांना मारून तो दिनकराला मोकळं करतो. विजांचे तडाखे बसतात. प्राणीमात्र एकदम धास्तावतात. गगन कडकडून विविध ठिकाणी तडकते.
या इह्लोकाने एक कर्म केलं. एका महाभूताने दुसऱ्याला मर्यादित ठेवले. अशातऱ्हेची सृष्टी रचनेची स्थिती आहे नाहीतर ती केव्हाच नष्ट झाली असती. असे आत्म्याचे अनंत भेद आहेत. सगळे जाणतील असं कसं होईल? विवरण करता करता मनाचं मनाच्या चिंधड्या होतात, मन नष्ट होण्याच्या मार्गाला लागतं. अशी माझी उपासना आहे उपासकानी मनामध्ये आणावी. ब्रह्मदेवाला हा महिमा काय कळणार? उभारणी, विसर्जन हेच भजनाचं लक्षण. हे सगळे सज्जन जाणतात! मी आणखी काय सांगणार? इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहक्षेत्र निरूपण नाम समास अष्टमः समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127