(रत्नागिरी)
मुंबईमधील मानखुर्द येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७ लाख १० हजाराच्या बनावट नोटा पकडल्या. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातील दोघेजण खेड व एक चिपळूणमधील आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हाभरात काही बाजारपेठेत काही दिवसांपासून बनावट नोटा सापडत होत्या. २००, ५०० रुपयांच्या नोटा चलनात येत होत्या; मात्र या नोटांचे रंग फिकट पडल्याने या बनावट नोटा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे अनेक दिवस हा विषय चर्चिला जात होता. मुंबई मानखुर्द येथे क्राईम ब्रँचने या प्रकरणी मोठी कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंबई क्राईम ब्रँचचे काही अधिकारी चिपळूण व खेडमध्ये दाखल होऊन त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर धाड टाकून झडती घेतली व त्यांना मुंबई येथे नेण्यात आले.
मुंबई येथील मानखुर्द महामार्गावर हे टोळके भारतीय बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका कारमधून ७ लाख १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या कारमध्ये १००, २०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. यामध्ये खेडमधील दोघांचा समावेश असून चिपळूण तालुक्यातील पाचाड येथील एकाचा समावेश आहे. यामध्ये शाहनवाज आयुब शिरळकर (५०), राजेंद्र आत्माराम खेतले (४३, रा. पाचाड, ता. चिपळूण), संदीप मनोहर निवळकर (४०) व ऋषीकेश रघुनाथ निवळकर (२६, रा. खेड) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून चिपळूण परिसरात नोटांचा छापखाना असल्याचा पोलिसांना संशय आहे.