(नाणीज / वार्ताहर )
मनुष्य जन्म म्हणजे भगवंताने माणसाला सुधारण्यासाठी दिलेली एक संधी आहे. त्यासाठी सद्गुरुंच्या सहवासात रहा. तेच खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक करून देतात, असा उपदेश जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांना केला. गैरुपौर्णिमा सोहळ्याचा समारोप जगद्गुरू श्रींच्या अमृतमय प्रवचनाने झाला. दिवसभर जोरदार सुरू असलेला पाऊस या काळात थांबला होता. त्यामुळे सर्वांना प्रवचन चांगले ऐकता आले.
प्रवचनात श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले,” सद्गुरूंचा उपदेश व सहवासाने या जीवनरुपी मिळालेल्या संधीचे सोने करता येते. म्हणजेच ते जीवनाचे खरे सार्थक करून देतात. शेतकरी जसे शेतातील तण काढतो तसे सद्गुरू आपल्या शरीरातील त्रिगुण व तमो गुण काढतात वा कमी करतात. सत्वगुण, सात्विकताही योग्य मार्गाने वाढवतात, जोपासतात.”
ते म्हणाले, ” संत नेहमी सांगतात माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. संत खरा माणुसकी धर्म आचरणात आणून देतात व आपल्यात आमूलाग्र बदल घडवून आणतात. म्हणून व्यास पौर्णिमा सद्गुरुंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते.”
ते पुढे म्हणाले, ” मोक्ष मिळण्यासाठी त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन निःशेष व्हावे लागते. त्यासाठी सात्विकता हाच खरा मार्ग आहे. त्यात ज्ञान, दान, क्षमा, दया, शुद्धता, संयम, विनय, समाधान असे गुण दिसून येतात. सात्विकता ही संजीवनी म्हणून वापरली पाहिजे,अथवा आचर-विचारात आणली पाहिजे. आपल्यात कायिक, वाचिक व मानसिक सात्विकता असायला हवी.”
यापूर्वी प.पू. कानिफनाथ महाराजांचे प्रवचन झाले. त्यांनी सद्गुरूंचे महत्व, त्यांचे मनुष्य जीवनातील महत्व, सद्गुरुंच्या चरणी लीन का व्हावे ते संगितले. सर्वात शेवटी देवाला साकडे घातल्यानंतर वारी उत्सवाची सांगता झाली.
फोटो:
नाणीजक्षेत्री रविवारी गुरुपौर्णिमा उत्सवात प्रवचन देताना जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज.