(कोल्हापूर)
कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र मंगळवारी पुन्हा पावसाने जोर धरला. यामुळे शहरात दिवसभर पाण्याचे साम्राज्य होते. धरणक्षेत्रात अद्याप जोरात पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली गावाजवळ पुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी केर्ली रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्ली ते कोतोली फाटादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली. येथील पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काल दुपारी दोन वाजले पासून पोलिसांनी पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक वाहने खोळंबली आहेत. केर्ली, जोतिबा रोड, पन्हाळा रोड, दानेवाडी, वाघबीळ या मार्गाने पर्यायी वाहतूक सुरू आहे.
पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून ४१ फूट २ इंचांवर असलेली पाणी पातळी रात्री 12 वाजता ४१ फूट ९ इंचांवर पोहोचली होती. जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले असून, दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाण्याची पातळीही झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरालगतच्या काही गावांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली.
पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुरामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासन सतर्कतेवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने 8 राज्यमार्ग व 26 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. तसेच नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूरसह सांगलीलाही महापुराचा धोका निर्माण झाला असून, अलमट्टीचा पाणीसाठा कोल्हापूर व सांगलीच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. अलमट्टी धरणातून मंगळवारी रात्रीपासून 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगलीचा महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेकने विसर्ग करण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.