(मावळ)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर प्रियकर आरोपीनी 25 वर्षीय महिलेचा मृतदेह नदीत फेकताना महिलेची दोन्ही मुले आरडाओरडा करत असल्याने मुलांनाही जिवंत नदीत फेकले. त्यामध्ये एक मुलगा 5 वर्ष व दुसरा 2 वर्षाचा होता. या तिघानाही इंद्रायणी नदीत फेकले . हा धक्कादायक प्रकार 6 ते 9 जुलै दरम्यान घडला आहे. समरीन निसार नेवरेकर (वय 25), ईशांत निसार नेवरेकर (वय 5), इजान निसार नेवरेकर (वय 2, रा. वराळे, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मृत महिलेच्या वडिलांनी सोमवारी फिर्याद दिल्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गर्भपात करण्यासाठी मदत करणारी महिला एजंट बुधवंत, कळंबोली मधील संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात समरीन नेवरेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची चौकशी करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. समरीन हिला तिचा प्रियकर गजेंद्र याने गर्भपात करण्यासाठी ठाणे येथे त्याच्या मित्रासोबत पाठविले होते. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत तिथल्या डॉक्टरांनी नजीकच्या पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र डॉक्टरांनी तसे केले नाही. या उलट डॉक्टरांनी समरीन हिचा मृतदेह आरोपी रविकांत गायकवाड आणि एजंट महिला बुधवंत यांच्या ताब्यात दिला. आरोपींनी समरीन हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह इंदोरी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर आणला. तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. दरम्यान दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. आरोपींनी आपले बिंग फुटेल म्हणून दोन्ही मुलांना जिवंतपणे नदीमध्ये फेकून दिले.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गजेंद्र आणि रविकांत या दोघांना अटक केली. दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम मस्के तपास करीत आहेत.