(संगमेश्वर)
सेवा भारती कोकण प्रांत, फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प संगमेश्वर याअंतर्गत तालुक्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम कार्यान्वित आहे. दरमहाचे नियोजन करून प्रकल्प शिक्षक दिलीप काजवे हे इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन विज्ञान विषयाचे प्रयोग करून दाखवतात. त्याचे साहित्य, कृती, निरीक्षण , व निष्कर्ष या मुद्द्यांची प्रत्यक्ष प्रयोगाने माहिती समजावून दिली जाते. तसेच या उपक्रमांतर्गत वनस्पती, निसर्ग , पाणी, अवकाश, खनिजे, शेती, प्राणी इत्यादींची माहिती सखोल पणे दिली जाते.
सध्या कोकणात चालू असलेला भात शेती लावणीचा हंगाम पहाता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तुरळ नं.१ ता. संगमेश्वर येथे मुलाना भात लावणी समजावी म्हणून शेती, मशागत, नांगरणी, पेरणी,रोपे काढणे, व रोपांची प्रत्यक्ष लावणी करणे इत्यादी गोष्टींचा मुलांना अनुभव यावा याकरिता मुलांकडून प्रत्यक्ष लावणी करण्यात आली.
श्रम व श्रमाचा आनंद घेत प्रत्यक्ष नांगरणीचे व भात लावणीचे प्रात्यक्षिक मुलांनी करून दाखवले. त्यातून श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री पुरुष समानता, सौजन्यशीलता, इत्यादी मूल्ये नक्कीच जोपासली जातील. यावेळी तुरळ गावचे माजी सरपंच शंकर लिंगायत,शिक्षक मधुकर गडदे, हरिश्चंद्र नांदिवडेकर, सुवार्ता गवळी, वैष्णवी खरडे, प्रकल्प शिक्षक दिलीप काजवे, अंगणवाडी सेविका संध्या तुरळकर, फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे माजी विद्यार्थी शुभम लिंगायत, सागर गुरव व शाळेतील विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.