(राजापूर / तुषार पाचलकर)
“महाविद्यालयाच्या प्रगतीत संस्थेबरोबरच पालक आणि आजी-माजी विद्यार्थी यांची भूमिका महत्त्वाची असते. आज महाविद्यालयाचा तिसावा वर्धापन दिन साजरा करत असताना या महाविद्यालयाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्मरण करूया. संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहरजी खापणे यांचे महाविद्यालयाच्या विकासासाठीचे प्रयत्न यशस्वी करूया. येऊ घातलेल्या नॅकला सामोरे जाताना संस्था, कर्मचाऱ्यांबरोबरच पालक व आजी-माजी विद्यार्थी यांची भूमिका महत्त्वाची असून यासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करूया”, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांतजी लिंगायत यांनी केले. ते श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महाविद्यालयाचा तिसावा वर्धापन दिन,पालक व माजी विद्यार्थी मेळावा या संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्री. सिद्धार्थ जाधव, सीडीसी समितीचे सदस्य श्री. खुशीराम मोरे, संस्थेचे माजी सरचिटणीस नारायण पांचाळ, माजी ओएस नरेश पाचलकर, परुळेचे उपसरपंच संतोष सावंत, परुळेचे पोलीस पाटील सुनिल कस्पले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून झाली. तदनंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए. येल्लुरे यांनी महाविद्यालयाची ध्येयधोरणे आणि विद्यार्थ्यांची असणारी भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा डॉ.ए.डी. पाटील यांनी तर नॅक मूल्यांकनात आजी माजी विद्यार्थी व पालक यांची भूमिका प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाच्या ‘सह्यागिरी’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी कुणाल गांगण,कोळम हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश शेलार, संस्थेचे माजी सरचिटणीस श्री. नारायण पांचाळ, संस्था सदस्य सिद्धार्थ जाधवसर आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बी. टी.दाभाडे यांनी केले तर आभार डॉ. व्ही. एस.पाटील यांनी मांडले.या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.