(दापोली)
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत जिल्ह्यासह दापोली तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंवर शिक्षण सप्ताहात आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आ
ठवड्यातील प्रत्येक दिवशी एक विशिष्ट उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. माध्यमिक स्तरावर शिक्षण सप्ताह साजरा करण्यासाठी वर्गनिहाय मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली असून. त्यामध्ये घोषवाक्ये असलेली पोस्टर्स, खेळ तयार करणे, पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत कोडी, आव्हानात्मक कार्ड तयार करणे,लुडो सारखे इतर खेळ तयार करणे, कागद, बांबूच्या कांड्या यासारख्या साहित्यापासून खेळणी तयार करणे, अन्न, भाजीपाला याची तक्ते बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात वेगळा कार्यक्रम राबवला जाईल. शिक्षण सप्ताहात शैक्षणिक साहित्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टॉलचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक स्टॉलला नांवे देण्यात येणार आहेत. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य, संगीतमय शैक्षणिक साहित्य, हस्तलिखिताचे प्रदर्शन, शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, दिग्दर्शन वर्ग असे स्टॉल असणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता वृध्दींगत करण्यावर भर दिला जाणार आहे. लहान वयापासून बुध्दिमत्तेला चालना देत त्यांच्यातील प्रयोगशीलतेला वाव देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.
केवळ विद्यार्थीच नाहीत शिक्षक, समाज या सर्वांना यामध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीच्या जोरावर शैक्षणिक साहित्य तयार करून घेणे, वाचन, अंक गणितीय क्रिया, सांस्कृतिक कार्यक्रम, चावडी वाचन होणार असल्याचे जि.प. शिक्षणाधिकारी,यांचे मार्फत प्राथमिकस्तरावरून सांगण्यात आले आहे.
शिक्षण सप्ताहासाठी उपक्रमांचे केलेले नियोजन
सोमवार २२ जुलै अध्ययन, अध्यापन साहित्य दिवस, मंगळवार २३ जुलै मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, बुधवार २४ जुलै, गुरूवार २५ जुलै – क्रीडा दिवस, स्कृतिक दिवस., शुक्रवार २६ जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, शनिवार २७ जुलै- मिशन लाइफ अंतर्गत इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस. रविवार २८ जुलै- समुदाय सहभाग दिवस. असे विविध उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना दापोली पं.स.चे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी केल्या आहेत.