(पंढरपूर)
राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा आषाढी एकादशी सोहळा आज संपन्न होत आहे. हा नयनरम्य सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी सुमारे बारा लाखाहून अधिक वारकरी भाविक संतांच्या पालख्यांसोबत हरिनामाच्या गजरात पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा सपत्नीक पार पडली. यंदा बाळू शंकर अहिरे आणि पत्नी आशा बाळू अहिरे या दाम्पत्याला विठुरायाच्या पूजेचा मान मिळाला आहे. अंबासान तालुका जिल्हा सटाणा नाशिकमधील हे दाम्पत्य गेले १५ वर्षे सलग आषाढी वारी करत आहेत.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू झाली. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये मंगळवारीच दाखल झाले होते. पहाटे मानाच्या वारकरी दाम्पत्यासह त्यांनी महापूजा केली. दोन दिवस येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजनदेखील यावेळी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली.
यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलं. राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी राहू दे असं आपण विठ्ठलाला साकडं घातल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यास अनेक आमदार खासदार उपस्थित होते.