(संगमेश्वर)
गेली दोन वर्षे कोरोनामुळे बंद ठेवावा लागलेला देवी जाखमातेचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव कसबा संगमेश्वर येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने संपन्न होणार आहे. या उत्सवासाठी तालुक्यात हजारो भक्तगण ठिकठिकाणाहून दाखल झाले आहेत. मटण भाकरीचा प्रसाद आणि नवस लावणे – फेडणे यासाठी हा उत्सव खास ओळखला जातो.
बलिदानास योग्य दिवस पाहून देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव साजरा केला जातो. यासाठी फाल्गुन अमावस्या या दिवसाची निवड केली जाते. होळी सणाच्या दिवशी कसबा येथे या उत्सवाची मानकरी मंडळींकडून तारीख – वाराची घोषणा केली जाते. शिंपणे उत्सवाची तारीख ठरली की, राज्याच्या विविध भागात असणारे भक्तगण कसबा – संगमेश्वरला येण्याचे नियोजन करतात. सारेच भक्तगण लाल रंगाच्या उधळणीसाठी आतूर झालेले असतात. कसबा येथे चंडिका मंदिरात आणि संगमेश्वर येथे जाखमाता, निनावी मंदिरात हा उत्सव संपन्न होतो.
दिवसभर मानाचे फेरे ढोल ताशांच्या गजरात सुरु असतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर घराघरातून लाल रंगाची अशी काही उधळण केली जाते की, रंगलेला माणूस ओळखणे कठीण जाते. मंदिरामध्ये दिवसभर सुहासिनी ओटी भरण्यासाठी गर्दी करतात. ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत असे आणि नवीन नवस लावणारे भक्तगण नवस लावण्यासाठी मोठी गर्दी करतात. नवसाच्या बकरे, कोंबड्या आणि नारळांचा सायंकाळी प्रसाद तयार केला जातो. दिवसभर महिलावर्ग मंदिर परिसरात हजारो भाकऱ्या भाजतात. रात्री दहाच्या दरम्यान अंतिम फेरा पूर्ण झाल्यानंतर मटण भाकरीच्या प्रसादाचे वाटप केले जाते. हा प्रसाद मिळण्यासाठी भक्तगण पहाटे पर्यंत रांगेत उभे असतात. या उत्सवाला २५ हजार पेक्षा अधिक भाविक उपस्थित रहातात. पाण्यात मिसळलेल्या लाल रंगाची मनसोक्त उधळण हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य समजले जाते. देवी चंडिका, जाखमाता आणि निनावी देवी मंदिर सुशोभित करण्यात आले असून विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.