(लांजा)
दोन महिलांना चिरडून त्यातील एकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकाला लांजा न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ही अपघाताची घटना २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटात घडली होती.
आंजणारी पेंढारीवाडी येथील रहिवासी असलेल्या दोन्ही महिला नेहमीप्रमाणे सकाळी शेतीच्या कामासाठी चालल्या होत्या. त्या मुंबई-गोवा महामार्गावरून चालत जात असताना लखनऊ ते गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने या दोघींना धडक दिली होती. एच.आर.३८ व्ही.८७९४ या क्रमांकाचा हा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दिन अन्सारी (व २६, रा. तहसील वैनपूर, जिल्हा- कैमूर, बिहार) हा चालवत होता. या ट्रेलरने या दोघी पादचारी महिलांना धडक दिल्यानंतर पल्लवी प्रकाश पेंढारी (४७, राहणार आंजणारी पेंढारीवाडी) या महिलेला अक्षरशः चिरडले होते. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता तर जयश्री धोंडू पेंढारी (वय ५५, राहणार आंजणारी पेंढारीवाडी) ही गंभीर जखमी झाली होती.
या अपघात प्रकरणी लांजा न्यायालयाने ट्रेलरचालक सद्दाम हकिमुद्दीन अन्सारी याला दोषी ठरवत त्याला शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये भा.दं.वि. कलम ३०४ (अ) नुसार एक महिना सश्रम कारावास, २७९ नुसार १००० रूपयांचा दंड, ३३७ नुसार ५ दिवस सश्रम कारावास, ३३८ नुसार १० दिवस सश्रम कारावास व मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार १०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास, मो. वा. का. क १८४ नुसार १००० रुपयांचा दंड याप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
दिवाणी न्यायालय लांजाचे न्याय दंडाधिकारी (वर्ग- १) पी. आर. भोसले यांनी ही शिक्षा ठोठावली. याकामी सरकारी वकील म्हणून श्रीम. प्रतिभा पवार यांनी काम पाहिले. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख यांनी तपास केला. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे यांनी काम पाहिले.