(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गानसुरवाडी येथील नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या साकवाच्या रस्त्या लगतची संरक्षण भिंत कोसळल्याने येथील एस.टी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिक, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती व शालेय विद्यार्थ्यांना हा मार्ग अत्यंत त्रासदायक बनला आहे.
कळझोंडी गानसुरवाडी येथे २ वर्षापूर्वी हा साकव आर. सी. सी मजबूत बांधकाम करून बांधलेला आहे. या मार्गावरून एस.टी वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. परंतु गेल्या २ दिवसापूर्वी संपूर्ण जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला यामध्ये कळझोंडी गानसुरवाडी येथील साकवाजीक रस्त्या लगतच असलेली चिऱ्याची भिंत उन्मळून पडून नदीपात्रात जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. येथील नागरिकांना आता एस.टी बस साठी अर्धा- पाऊण तास पायपीट करावी लागणार आहे. तरी सबंधित खात्याने येथील पडलेली ही चिऱ्याची संरक्षण भिंत नव्याने आर. सी. सी बांधकाम करून त्वरित दुरुस्त करावी, अशी आग्रही मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या या नदीवरील साकवाची (पूल) पहाणी करण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीपशेठ पवार, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष महादेव आग्रे, अनिल फडकले, ग्रामपंचायत सदस्या सौ. वेदिका निंबरे, महिला कार्यकर्त्या सौ. फडकले, सामाजिक कार्यकर्ते संदीप निंबरे, किशोर पवार, मुख्याध्यापक जयदीप यादव यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने पहाणी केली.
फोटो – कळझोंडी गाणुसरवाडी येथील संरक्षण भिंत पडली असून पाहणी करताना ग्रामस्थ.