( रत्नागिरी )
शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने रत्नागिरीतील एका प्रौढाची तब्बल ५ लाख ७५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीची सल्लागार सांची अरोरा हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीचा हा प्रकार २९ फेब्रुवारी २०२४ ते १३ मे २०२४ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी अभय कृष्णनाथ पंडित (५२, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांनी फेसबुक ॲपवर अपोलो स्पॉन्सर जॉइन अवर फ्री व्हॉट्सॲप स्टडी ग्रुप ऑफ शेअर मार्केटिंग अशी जाहिरात पाहिली. या कंपनीच्या नावाने गुंतवणुकीचे व त्यावर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सल्लागार सांची अरोरा हिने तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पंडित यांना जॉइन करून घेतले. त्यानंतर प्रोफेसर जॉनहँसमॅन यांच्या आवाजातील ऑडिओद्वारे विश्लेषण करून अपोलो मोरसेल्लो या ॲपचा वापर करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून पंडित यांनी त्यात ८ लाख रुपये गुंतवले. त्यापैकी २ लाख २५ हजार रुपये परत मिळाले. परंतु उर्वरित ५ लाख ७५ हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली.