(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीला सध्या मोठ्या प्रमाणात भगदाड पडले आहे. तसेच या संरक्षण भिंतीला समुद्राच्या उसळणाऱ्या मोठ्या लाटांचा तडाखा बसत असल्याने संरक्षण भिंतीचा बराचसा भाग कोसळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या विश्रामगृह इमारतीसमोर असलेल्या संरक्षण भिंतीला सध्या मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. गेल्या पाच सहा वर्षांंपासून येथील संरक्षण भिंतीचा भाग कोसळलेला आहे. मात्र त्यानंतर अद्यापही याकडे संबंधित मेरिटाइम बोर्ड ( बंदर खाते) विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्यामुळे संरक्षण भिंतीचा कोसळलेला भाग “जैसे थे ” च राहिला होता.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पर्यटकांना पायऱ्यांवर बसून अथांग पसरलेल्या समुद्राचा मनसोक्त आनंद घेता यावा, याकरिता पायऱ्या पायऱ्यांची संरक्षण भिंत पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत बांधण्यात आली यावर मेरिटाइम बोर्ड खात्याने निधी खर्ची घातला होता. त्यानंतर गेला काही वर्षांपूर्वी या संरक्षण भिंतीचा एका बाजूचा भाग ढासळला होता. मात्र त्यानंतर संबंधित मेरिटाइम बोर्ड अर्थात बंदर खात्याने कुठल्याही प्रकारे गांभीर्याने लक्ष दिले नाही अखेर समुद्राच्या जोरदार लाटांच्या तडाख्याने या संरक्षण भिंतीचा भाग टप्प्याटप्प्याने ढासळला जाऊन यंदाच्या मुसळधार पावसाळ्यात आणि समुद्राच्या जोरदार लाटांच्या तडाख्याने या संरक्षण बंदीचा भाग ढासळला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या संरक्षण भिंतींच्या पायऱ्या पायऱ्यांवर बसून समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
एकूणच या ठिकाणी समुद्राच्या मोठ्या लाटांच्या तडाख्याने ढासळलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरावस्थेकडे संबंधित मेरिटाइम बोर्ड खात्याने तातडीने लक्ष घालून पावसाळा संपल्यानंतर योग्य ती उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक व पर्यटक- भाविकांकडून करण्यात आली आहे. तसेच आपल्या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील या संरक्षण भिंतीची मोठी दुरावस्था लक्षात घेऊन गणपतीपुळे ग्रामपंचायतीने सुद्धा संबंधित विभागाकडे ठोस पाठपुरावा करून संरक्षण भिंतीचे काम मार्ग लावावे, असे मत जाणकार व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आले आहे