( चिपळूण )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण येथे बहादूर शेखनाका ते पाग नाकापर्यंत सर्वांत मोठा पूल बांधण्यात येत आहे. परंतु, या पुलाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कमालीचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दोन वेळा मोठे आणि गंभीर अपघात झालेले आहेत. महामार्गाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन सुरक्षेबाबतच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांनी केली आहे.
गेल्याच आठवड्यामध्ये या पुलाचे काम करत असताना तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले होते. याअगोदर पुलाचे दोन गर्डर कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात कोणत्याही प्रकारच्या खबरदारी घेतली जात नसल्याचे उघडपणे दिसत आहे. कामगारांना साधे हेल्मेट अथवा सेफ्टी शूज, इतर सुरक्षेची साधने पुरवण्यात आली नव्हती, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पुलाच्या एकूणच कामाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याबाबत प्रशांत यादव म्हणाले की, आम्ही कोणत्याही विकासकामांमध्ये अडथळा आणू इच्छित नाही. परंतु, मानवी मूल्य आणि मानवी जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या दृष्टीने या गोष्टीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून कोणताही कामगार व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका होणार नाही, अशा प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व औद्योगिक मानांकनानुसार सुचवलेल्या उपाययोजना केल्या जाव्यात आणि यापुढे अपघात होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
महामार्गाच्या एकूणच कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. या कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यादव यांनी दिला आहे.