(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील माळनाका ते जयस्तंभ या मुख्य रस्त्यावर डांबरातून विभक्त झालेली खडी रस्त्यावर विखुरलेली आहे. ब्रेक मारल्यावर अनेक दुचाकी वाहने घसरत आहेत. यामुळे किरकोळ अपघातही होत आहेत, मात्र प्रशासनाला एखाद्या दुचाकीस्वाराचा बळी हवा आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे. नुकत्याच केलेल्या या रस्त्यांमध्ये गफला तर केलाच आहे, मात्र तो आता लोकांच्या जीवावर आला आहे.
शहरातील रस्त्यांवर खड्डे व खडी पसरल्याने हे रस्ते दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. मारुती मंदिर सर्कल पासून शहरातील खालच्या भागापर्यंत असणारे रस्ते कमालीचे धोकादायक झाले आहेत. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या खाली लेवल करण्यासाठी डांबरीकरण करण्यात आले, त्यानंतर त्याच्यावर काँक्रीटचे रस्ते घालण्यात आले. मात्र मारुती मंदिर पासून खाली जयस्तंभ पर्यंत काँक्रिटीकरणाचे काम पावसापूर्वी करणे शक्य नसताना देखील त्या ठिकाणी घाईघाईने हलक्या दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले. पाऊस सुरू होताच या डांबरीकरणाची खडी रस्त्यावर पसरली असून या ठिकाणाहून दुचाकी व इतर वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. बारीक-मोठी खडी व रेती रस्त्यावर आल्याने चार चाकी वाहने व दुचाकी सर्रास सरकत आहेत. त्यातच अनेक भागात खड्डे पडले असून या रस्त्यावरून दुचाकी चालवणे धोकादायक झाले आहे.
उघाडी पडताच खड्डे बुजवले जातील असे नगरपरिषदेकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात दोन दिवस उघाडी असूनही नगरपरिषदेने रस्त्यावरील खडी बाजूला घेण्यासाठी कोणतीही पावले न उचलता त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यावर कडी म्हणजे विरोधी राजकीय पक्ष मुख्याधिकाऱ्यांना फक्त निवेदन देऊन, बातमी छापून आणत त्यावर समाधान मानत आहेत. आता या प्रश्नावरून नागरिकांनीच नगरपरिषद प्रशासनाला कडक जाब विचारणे आवश्यक आहे. येणाऱ्या विधानसभेला शहरातील नागरिक या संपापाचे उत्तर मतपेटीतून नक्कीच देतील, असे आता बोलले जात आहे.