(रत्नागिरी)
शहरात सावकारी धंदा सुरू असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायिकाला शिवीगाळ करून मानसिक त्रास देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत संशयित आरोपी राजेश नंदाने ( वय ३३ वर्षे ,रा- कारवांचीवाडी, रत्नागिरी) अमोल श्रीनाथ (वय ४५ वर्ष, रा. कारवांचीवाडी ) या दोघांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दिनांक ९ जुलै २०२४ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात फिर्यादीं यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी संशयित अमोल श्रीनाथ याच्याकडून दहा टक्के व्याजाने 1 लाख 50 हजार रुपये फिर्यादी यांनी घेतले होते. ही रक्कम श्रीनाथ याने दरमहा दहा टक्के व्याजाने कर्जावर दिली होती. दिलेल्या रक्कमेबाबत राजेश नंदाने याने फिर्यादी यांना सांगून श्रीनाथ याने ही रक्कम व्याजाने देण्याबाबत फिर्यादी यांना सांगितले. या रकमेचे व्याज म्हणून फिर्यादी यांनी संशयित राजेश नंदाने यांच्याकडे एकूण ९१ हजार ५०० रुपये दिले. मात्र रक्कम देऊन सुद्धा फिर्यादी यांच्याकडे संशयित आरोपी राजेश नंदाने आणि अमोल श्रीनाथ या दोघांनी व्याज्याच्या अधिक पैशाची मागणी केली. परंतु फिर्यादी यांनी पैसे दिले नाहीत. हा प्रकार दिनांक २२ डिसेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ रोजीच्या कालावधीत घडला आहे.
दरम्यान संशयित दोघांनी फिर्यादी यांचे मामा महेश विश्वनाथ मयेकर व फिर्यादी यांना व्हाट्सअपद्वारे कॉल व मेसेज करून शिवीगाळ केली. तसेच मानसिक त्रास देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. यावरून शहर पोलिसांनी मंगळवारी (दिनांक ९ जुलै २०२४ ) भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ३५१(२), ३(५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम ४४, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.