(चिपळूण)
सुमारे १० कोटीहून अधिकचा निधी गाळ उपशावर खर्च केला. मात्र उपसलेला गाळ भरावासाठी आणि शहरातील तळी बुजवण्यासाठी केला गेला. इमारती, बंगले उभारण्यासाठी जागोजागी केलेल्या भरावामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. केवळ साडेतीन तास पडलेल्या पावसानंतर शहरात रविवारी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
या परिस्थितीला जबाबदार असलेल्या बांधकामधारकांना प्रशासनाने वेळीच आवर घातला नाही किंवा चुकीच्या दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द न केल्यास चिपळूण काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. गेले दोन दिवस येथे मुसळधार पाऊस सुरू असून रविवारी सायंकाळी शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही तासाच्या पावसाने ही परिस्थिती निर्माण झाल्याने शाह यांनी शहरात जागोजागी केलेल्या भरावाला आक्षेप घेतला आहे.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांना सोमवारी निवेदन सादर केले आहे. चिपळूण शहराची रचना बशीच्या आकाराची आहे. त्यामुळे चिपळूण हद्दीतील गाळ काढल्यानंतर पाणी साचून राहते. त्यासाठी धामणदिवीपासून गाळ काढण्याची गरज आहे. परंतू तेथे गाळ न काढता बाजारपेठेत हद्दीतील गाळ काढून तो शहरहद्दीत टाकल्याने त्याचा उलटा परिणाम होऊ लागला आहे.
शिवनदी किनाऱ्यावर जागोजागी पत्रा शेड उभारलेल्या दिसतात. याचपद्धतीने जुना कालभैरव मंदिरालगतच्या भागात पुर्वी शेती केली जायची. त्यामुळे या परिसरातील पाणी लगतच्या नाल्यातून वाशिष्ठी नदीला वाहून जात होते. चिंचनाका येथेही केलेल्या भरावाचा फटका बसू लागला आहे. शहरातील अनेक ठिकाणी नव्याने भराव केले असून त्या-त्या भागातील लोकवस्तीला त्याचा फटका बसू लागला आहे, असे शाह यांनी माहिती देताना सांगितले.