भाईंदर रेल्वे स्थानक परिसरात बाप-लेकाने धावत्या ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, दोघांची ओळख पटली असून ते मुलगा आणि वडील होते. मुलाचे नाव जय मेहता (वय- 30) आणि वडिलांचे नाव हरिष मेहता (वय- 60) अशी दोघांची नावे आहेत. वसई रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आत्मत्येचे नेमके कारण शोधले जात आहे. ही घटना सोमवारी (8 जुलै) सकाळी घडली. भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 च्या समोरील ट्रॅकवर सकाळी 10.30 वाजेच्या सुमाराल हा संपूर्ण प्रकार घडला.
वसई येथील वसंत नगरी परिसरात मेहता कुटुंब राहते. मेहता पिता-पुत्र घरातून नेमके केव्हा बाहेर पडले याबाबत माहिती मिळू शकली नाही. सोमवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास दोघांचाही मृतदेह भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील रुळावर आढळला. वसई पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, हे पिता-पूत्र सोमवारी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. ते फलाट क्रमांक 6 वरुन खाली उतरले आणि मीरा रोडच्या दिशेने चालत निघाले. दरम्यान, रेल्वे रुळावरुन चालत असताना लोकल ट्रेनने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही काळ स्थानकात एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.