(दापोली)
शहरामध्ये देहविक्री करण्यासाठी गजानन लॉजमध्ये महिला पुरविल्याप्रकरणी दापोली बाजारपेठ येथील संशयित वीरेंद्र वेल्हाळ याच्यावर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दापोली शहरातील लॉजवर छुप्या पद्धतीने देहविक्री केली जात असल्याचे समजले होते.
त्यानुसार पाळत ठेवून डमी ग्राहक पाठवून दापोली शहरातील गजानन लॉजवर धाड टाकण्यात आली. संशयित आरोपी वीरेंद्र वेल्हाळला ताब्यात घेण्यात आले. महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सांची सावंत यांच्या फिर्यादीनुसार संशयित वेल्हाळ याच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा व अन्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे हे करीत आहेत.