(खेड)
बुद्धिमत्ता विचारशक्ती भावना या मनुष्यप्राण्याला उपजत मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने योग्य वेळी व योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे. यातून मनुष्य जर सत प्रवृत्त असेल तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते. याच भावनेतून खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तारअधिकारी श्री संतोष भोसले यांनी खोपी प्रभागातील सर्व शिक्षकांना दिव्यांग विद्यार्थिनी रिया संदीप मोरे या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खोपी या विद्यालयात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या आणि इयत्ता दहावी मध्ये 70 टक्के गुण मिळवून आपल्या जिद्दीच्या नवनवीन शिखरे पादाक्रांत करणाऱ्या करणाऱ्या या विद्यार्थिनीला स्वइच्छेने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. मात्र हे आवाहन करताना संतोष भोसले यांनी आपल्यापासून सुरुवात केली आणि बघता बघता 24 हजार 500 रुपये जमा झाले आणि ही आर्थिक मदत रिया व तिची आई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या शिक्षण परिषदेमध्ये जुनिअर कॉलेज खोपी येथे शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनी रिया संदीप मोरे हिने आपल्या अपंगत्वावर मात करत इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये 70 टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळवले. पुढील शिक्षणासाठी या प्रशालेमध्ये प्रवेश घेतला याबद्दल तिचा खोपी प्रभागातर्फे शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रिया ही कमरेखाली पूर्ण अपंग आहे, तरीही खचून न जाता अनेक संकटांची झुंज देत रिया ही यशस्वी मार्गक्रमण करत आहे. आव्हानात्मक आयुष्याची संघर्ष करत रिया ही पुढील शिक्षण घेत आहे. खरोखरच रिया करत असलेला संघर्ष अभूतपूर्व असाच आहे, त्याचप्रमाणे तिच्या या संघर्षासाठी तिच्या पाठीशी उभे राहून तिला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे संतोष भोसले यांचा हा अनोखा प्रयत्न वाखणण्याजोगा आहे.
या या शिक्षण परिषदेला उपस्थित असलेले खेडचे गटविकास अधिकारी श्री. यशवंत भांड यांनी देखील या अनोख्या उपक्रमाबद्दल विस्तार अधिकारी संतोष भोसले यांचे अभिनंदन केले