(खेड)
तालुक्यातील शिरवली शाळेच्या वर्गखोल्यांचे छत कोसळल्यानंतर आक्रमक झालेल्या पालकांनी धोकादायक शाळेत पाल्यांना पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे शाळा अजूनही बंदच होती. अखेर सोमवारी रात्री ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत एकमुखी तोडगा निघाला आहे.
आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी पालकांनी दर्शवली. सुरक्षित वर्गखोल्यांसह अंगणवाडीत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आल्याने मंगळवार (२) पासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होताच शिक्षण विभागानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. छत कोसळल्यानंतर पालक तसेच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तातडीने शाळेची दुरुस्ती न झाल्यास पंचायत समितीच्या आवारातच विद्यार्थ्यांसमवेत शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून कोणीही मुले शाळेत जात नव्हती. अखेर मंगळवारपासून शाळा सुरू झाल्यावर शाळेत बालगोपाळांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला आहे.
वर्गखोल्यांची दुरुस्ती होईपर्यंत…
सोमवारी रात्री झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला असून, शिक्षण विभागाने तसे मान्य केले आहे. त्यामुळे छत कोसळलेल्या वर्गखोल्यांची दुरुस्ती होईपर्यंत सुरक्षित असलेल्या वर्गखोल्यांसह अंगणवाडीत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे