जय जय रघुवीर समर्थ. लोकांचा स्वभाव लालची असतो. प्रारंभीचा देव देव म्हणतात म्हणजे मला काहीतरी द्यावे अशी वासना काहीही सेवा न करता मालकाला काहीतरी मागाव त्याप्रमाणे कोणतीही भक्ती केलेली नसली तरी त्यांना देवाची प्रसन्नता हवी असते. कष्ट केल्याशिवाय फळ नाही. कष्ट केल्याशिवाय राज्य नाही. केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. आळसामुळे काम नष्ट होतं हे तर अनुभवाला येतं. तरी देखील हीन जन असतात ते कष्ट चुकवतात. आधी कष्टाचे दुःख जे सोसतात, त्यांना पुढे सुखाचा फळ मिळतं आणि आधी आळसाने जे सुखावतात त्यांना पुढे दुःख आहे.
इहलोक किंवा परलोक दोन्हीकडे सारखाच नियम आहे. या दीर्घ सूचनेचे महत्त्व समजलं पाहिजे. मिळवतात तितके खाऊन टाकतात ते कठीण काळ आला की मरून जातात. दीर्घकालीन योजना करतात तेच भले लोक असतात. धनधान्याचा संग्रह करावा, परलोकासाठी परमार्थ करावा, पुण्याई करावी. ती केली नसेल तर जिवंत असूनही ते मेल्यासारखेच असतात. एकदा मरण आल्याने काही सुटका होत नाही. पुन्हा जन्मोजन्मी यातना बघाव्या लागतात. स्वतःला मारतात, वाचवित नाहीत त्याला आत्मघातकी म्हणणार नाही तर दुसरे काय? प्रत्येक जन्मामध्ये आत्मघात केला तर किती वेळा केला त्याचं गणित कोणी करायचं? म्हणून जन्म मृत्यू चुकणार नाही. देव सगळं काही करतो असं प्राणिमात्र बोलतात पण त्याच्या भेटीचा लाभ अकस्मात होतो. विवेकाचा लाभ झाला की परमात्मा सापडतो, हा विवेक विवेकी माणसांकडे पाहायला मिळतो.
पाहिलं तर देव एक आहे परंतु अनेक देव मानले जातात ते अनेक असल्यामुळे त्यांना एक कसं म्हणता येईल? देवाचं कर्तृत्व आणि देव हे कळलं पाहिजे. हे कळल्याशिवाय किती लोक उगीचच काहीतरी बोलत असतात. उगीच मूर्खपणाने काहीतरी बोलतात. शहाणपण वाढवण्यासाठी, तृप्तीसाठी उपाय करण्यासारखे काहीतरी करतात. ज्यांनी उदंड कष्ट केले ते भाग्य भोगत राहिले. बाकीचे करंटे लोक नुसते बोलतच बसले. करंट्याचे लक्षण करंट.. ते विचक्षण लोक जाणतात. भल्याचे लक्षण उत्तम ते करंट्याला कळत नाही. ज्यांना कुबुद्धी म्हणजे सुबुद्धी वाटते, त्यांची कुबुद्धी वाढली तर तिथे शुद्धी कशी असेल? मनुष्यत्त्वाच्या जाणीवेला, मनुष्यात सोडण्याइतपत जो मदांध झाला आहे त्याचा खरं काय मानायचं? तिथे विचाराच्या नावाने शून्य आहे! विचाराद्वारे इहलोक आणि परलोक, विचाराद्वारे दोन्हीचे सार्थक होतं. विचाराद्वारे नित्य अनित्य विवेक पाहिला पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जन स्वभाव निरूपण नाम समास सप्तम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127