(मुंबई)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला. राजकारण समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला याकडे राज ठाकरेंचा पाहण्याचा दृष्टीकोन समोर आला. तसेच विविध प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. व्यक्ती येतात जातात, सत्ता जाते येते पण महाराष्ट्र कायमच राहणार आहेना, मग तुम्ही त्या महाराष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे. सध्या महाराष्ट्र जाती-पातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राज यांनी मराठी भाषा, महाराष्ट्र यावर भरभरून मत व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा आहे. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे 2 मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोलले पाहिजे. यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि मराठी म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही राज म्हणाले.
‘एखादा डाकू हनिमूनला गेला तर तो बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बंदूक घेऊन जातो का? तिथे तो वेगळा असतो. अर्थात मी माझी तुलना डाकूशी करत नाही’, असे राज ठाकरे म्हणाले आणि सभागृहात हशा पिकला. या उत्तरानंतर आनंद इंगळे कधी पळून जाण्याची वेळ आली का? या प्रश्नावर अडून राहिले. या प्रश्नासाठी त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना सहभागी करुन घेतले. अशी कधी वेळ आली होती का? असा प्रश्न त्यांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. त्यांनतर राज साहेबांना ते सांगायला आवडेल की नाही माहिती नाही पण 31 डिसेंबर…असा शब्द त्यांनी उच्चारला. या शब्दाला पुढे नेत हा लग्नाआधीचा किस्सा असल्याचे राज ठाकरे म्हणाले…
शर्मिलाच्या बाबांना पाहिले अन् पळालो
लग्नाच्या आधी एका 31 डिसेंबरला मी आणि शर्मिला, आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेव्हा शर्मिला आणि माझ्या प्रेम संबंधांबाबत माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना माहिती नव्हते. रात्री अडीच तीनच्या सुमारास मी शर्मिला यांना त्यांच्या घरी सोडायला गेलो. तेव्हा फाटकाजवळ कुणीतरी फिरताना दिसले, तेव्हा तिने मला तिथे बाबा आहेत, असे सांगितले. ती 31 डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितले की तिथे बाबा नाही तर वॉचमन आहेत, पण ते शर्मिला यांचे बाबा होते, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, हा आयुष्यातला एकमेव प्रसंग होता, जेव्हा मी पळून गेलो होतो, असे राज यांनी सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.