(गुहागर)
सध्या मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनाचे औचित्य साधून या आठवडय़ात गुहागर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील मुंबईवासी रहिवाशांचे मेळावे मुंबई दादर सेनाभवन येथील सभागृहात घेण्यात येत असून प्रत्येक दिवशी संध्याकाळी ६.०० वा. वेगवेगळ्या जि.प. गटांचे मेळावे आमदार श्री भास्करशेठ जाधव आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहेत. विकासकामे तर होतीलच, विधानसभेवर भगवा फडकवूया, लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून कामाला लागा असा कानमंत्र आमदार भास्करशेठ जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला यावेळी दिला.
शुक्रवार दि. २८.६.२०२४ रोजी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या मुंबईवासी रहिवाशांचा मेळावा घेण्यात आला. पावसाळ्याचे दिवस तसेच नोकरदार चाकरमानी आणि धंदेवाईक यांचा शुक्रवार हा कामकाजाचा दिवस असताना सुध्दा या मेळाव्याला वेळणेश्वर गटातील सुमारे ४०० अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय अनेक पदाधिकारी आणि सचिव विशाल खेडेकर व महेश गोवळकर सुद्धा उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या सौ. नेत्राताई ठाकूर आवर्जून उपस्थित होत्या. सुरुवातीलाच त्यांनी सदर मेळाव्यात सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून आभारही मानले. प्रस्तावणेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, जवळ- जवळ अडीच / पावणे तीन वर्षे होत आली, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूका झालेल्या नसतानाही विकास कामांबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करून आमदार जाधव सहकार्यातून जिल्हा परिषद गटातील अनेक कामे मार्गी लावलेली आहेत/ कामे सुरू आहेत. स्थानिक व मुंबई पातळीवर अशा अनेक गरजूंना आमदार आणि आम्ही सतत वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्न करत असतो. मात्र इतरांसारखी प्रसिद्धी करत नसतो.
यावेळी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर हे सुद्धा सदर मेळाव्यात उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विकास कामे करताना ज्यांचे आपल्याला सर्व प्रकारचे सहकार्य मिळते, त्यांच्या पाठीशी आपण सतत उभे राहिले पाहिजे. आपले स्थानिक लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार यांच्याच मार्फत आपली बहुतांशी विकास कामे होण्यासाठी मदत होत असते म्हणून जे आपली विकास कामे करत आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे/भक्कमपणे उभे राहून आपला विकास करून घ्यायला हवा.
शेवटी आमदार श्री भास्करशेठ जाधव यांनी आपल्या नेहमीच्या तडाखेबाज शैलीत लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अडचणी सांगून झालेल्या चूका / कमतरता सुधारण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून पुन्हा एकदा विधानसभेवर आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची धगधगती मशाल हातात घेऊन विधानसभेवर भगवा फडकवूया असा कानमंत्र सुद्धा उपस्थित सर्वांना दिला.