(पाली / वार्ताहर)
पाली ग्रामीण रुग्णालयामध्ये या आठवड्यात लहान बालकांवरील अवघड अश्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या असून त्यासोबत सात महिलांची सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती ही करण्यात आली आहे. सध्या पाली ग्रामीण रुग्णालयांमध्ये असणाऱ्या सुसज्ज असणाऱ्या शस्त्रक्रियागृहामध्ये विविध आजारांवरील त्या क्षेत्रातील तज्ञ सर्जन द्वारे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांनाही चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाली ग्रामीण रुग्णालयात अशा प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे रूग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पाली ग्रामीण रुग्णालय हे रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा या तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असल्याने कायमच येथे रुग्णांची संख्या जास्त असते परंतु मागील काही वर्षे येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. परंतु पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुमरे यांनी लक्ष देऊन येथे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या शासकीय रुग्णालयाचा फायदा रुग्णांना होत आहे.
पाली ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमच ८ लहान मुलांवर अत्यंत अवघड अश्या मुखाच्या, जिभेच्या, लघवीच्या वाटेच्या( Circumcision,Tie Tongue, Hydrocele) अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या याशिवाय या आठवडय़ात जवळपास ७ महिला रुग्णांची सिझेरियन शस्त्रक्रियेच्या द्वारे सुखरूप प्रसूती करण्यात आली आहे. पाली ग्रामीण रुग्णालयात या शस्त्रक्रिया स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व सर्जन डॉ. ज्ञानेश विटेकर,डॉ. विकास कुमरे यांनी केल्या, डॉ. विकास गायसमुद्रे यांनी शस्त्रक्रियेच्या साठी भुलतज्ञ म्हणून काम पाहिले.
या शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पालीचे वैद्यकिय अधिक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने पार पाडल्या बद्दल ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे तसेच आर. बी.एस.के. पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी ही उत्तम सहकार्य केले त्यामुळे या सर्वांचे आभार आहेत असे डॉ. कुमरे यांनी सांगितले.
पाली ग्रामीण रुग्णालय हे मध्यवर्ती असल्याने येथे सुसज्ज शस्त्रक्रिया गृह उपलब्ध असून येथे येणाऱ्या कालावधी येणाऱ्या पुढील कालावधीत जास्तीत जास्त शस्त्रक्रिया व अन्य सेवा उपलब्ध करून करून रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या मुळे रुग्णांना दर्जेदार सेवा व विविध आजारांवरील उपचार मिळत असलेले असल्याने रुग्णांमध्ये समाधान आहे.
यावेळी बोलताना पाली वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे यांनी सांगितले की, पाली ग्रामीण रुग्णालय हे ३० खाटांचे असून येथे क्ष किरण यंत्रणा, अद्यावत प्रयोगशाळा, नेत्ररोग, दंतरोग,स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध असतात. तसेच येथे अद्यावत शस्त्रक्रिया गृह उपलब्ध असल्याने यापुढेही येथे शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देणार आहोत.