(रत्नागिरी)
शहरातील मारुती मंदिर सर्कललगत पडलेल्या खड्यांची समस्या दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरत असते, नगर परिषद प्रशासनाने रत्नागिरीकरांना त्रास देण्याचेच ठरविले आहे की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरातील सर्व रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर काही रस्ते काँक्रीटीकरण करण्यात आले देखील. या काँक्रीटीकरण कामासाठी शंभर कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मारुती मंदिर ते माळनाका हा मुख्य रस्ताच काँक्रीटीकरणापासून ठेवून आतील रस्ते करण्याचे काम झाले. मारुती मंदिर ते माळनाका या भागातील रस्त्यावर काँक्रीटीकरणापूर्वी डांबरीकरण केले गेले आहे. नवे डांबरीकरण करून रस्त्याची सध्या झालेली अवस्था ही सुंदर रत्नागिरीला अशोभनीय आहे. यातून रस्त्याच्या कामाचा दर्जा दिसून येत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
शहरातील प्रमुख तीन मार्गावरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे साळवीस्टॉप ते मारुती मंदिर, मारुती मंदिर ते नाचणे आणि मारुती मंदिर ते मजगावरोड चाररस्त्यापर्यंतचे खड्यांचे प्रश्न सुटले आहेत. परंतु, पावसाळ्यात दरवर्षी मारुती मंदिर सर्कल लगत एकाच ठिकाणी सातत्याने खड्डे पडत आहेत. यंदाही पावसाळ्यात या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून, चारचाकी गाड्याही यात आपटत आहेत. त्यामुळे आपुसक नागरीकांनमधून लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला जात आहे.
बारीक खडी दुचाकींना धोकादायक
मारुती मंदिरपासून जेलरोडपर्यंत कॉक्रिटीकरणापूर्वी डांबरीकरणाचा पट्टा मारण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसात या ठिकाणी खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरली होती. त्यानंतर नागरिकांना होणारा त्रास जाणवून ठेकेदारांनी पुन्हा डांबरीकरणाचा पट्टा मारला. परंतु सलग तीन दिवस पडणाऱ्या मोठ्या पावसात पुन्हा खड्डे पडले आहेत. यातून बारीक खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वाराने ती त्रासदायक ठरत आहे.
मारुती मंदिर ते माळनाका खड्डे बुजवा
सध्या मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान छोटे-मोठे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा सर्वाधिक धोका दुचाकीस्वरांना बसत आहे. बाहेर आलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढला आहे. छोट्या खड्ड्यांमधून वाहने धक्के खात पुढे जात आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्यावर खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.