( रत्नागिरी )
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता १ लाख ५१ हजार ६८१ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत; मात्र ई-केवायसीची पूर्तता नसलेले २,४४४ शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार संलग्नीकरण करणे बंधनकारक आहे. कृषी विभागाकडून वारंवार आवाहन करूनही अद्याप काही शेतकऱ्यांचे ई- केवायसी, आधार संलग्नीकरण अपूर्ण आहे. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित राहत आहेत. जिल्ह्यात ई-केवायसीचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. अद्यापही दोन टक्के शेतकऱ्यांमध्ये वयोवृद्ध, हातांचे ठसे न जुळणे, मृत शेतकरी नोंद नसल्याची कारणे सांगितली जात आहे.
जिल्ह्यात १ लाख ६१ हजार ८८५ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी एकूण एक लाख ५२ हजार ५३९ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप ९ हजार १०२ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण अपूर्ण आहे. कृषी विभागाकडून गावागावांत ई-केवायसी व आधार संलग्नीकरणासाठी मोहीम राबविण्यात येते. खास नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतस्तरावर नोंदणी करण्यात येते; मात्र शेतकरी अल्प प्रतिसादामुळेच शासनाच्या लाभापासून वंचित राहत आहेत.