( चिपळूण )
शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा पुन्हा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतरही कुत्र्यांचा त्रास संपलेला नाही. गेल्या पंधरा दिवसात शहरात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केली आहे.
मोदी यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांसंदर्भात मागील काही महिन्यात प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी नगर परिषदेने कुत्र्यांची नसबंदी केली. मात्र, अजूनही कुत्र्यांची संख्या कमी झालेले नसून शहरातील चौकाचौकात कुत्रे झुंडीने फिरताना दिसत आहेत.
या कुत्र्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. मागील पंधरा दिवसात बारा जणांवर मोकाट श्वानांनी हल्ले केले आहे. शाळा, महाविद्यालय सुरू झाली आहेत. विद्यार्थी पूर्वी शहरातील रस्त्यांवर एकटे प्रवास करत होते. मात्र, कुत्र्यांच्या दहशतीमुळे रस्त्यावरून फिरणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.