(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा उपद्रव सर्वत्रच वाढला आहे. शहरासह तालुक्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे प्रशासनाला अवघड झाले आहे. सध्या या मोकाट जनावरांनी रस्त्यात ठाण मांडून बसण्यास सुरुवात केली असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावर तसेच शहरातील इतर रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच चौका-चौकात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. काही केल्या मोकाट जनावरे रस्त्यावरून हलत नसल्याने रस्त्याच्या बाजूने वाहने चालविण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे.
रत्नागिरी शहरासह मिऱ्या-नागपूर महामार्गावर या मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. वासरांसोबत ही जनावरे रात्रीच्या वेळी रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने रात्रीच्या वेळी ही जनावरे दिसून येत नाही. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडुन विमानतळ येथे पत्र्याची शेड उभारुन चारा-पाणी देऊन तिथे ठेवण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेला वर्ष उलटले पुन्हा जनारांचा त्रास वाहनचालकांना होत आहे.
सागरी महामार्गावरील पावस ते भाट्ये मार्गावर गोळप, कोळंबे, कुर्ली या फाट्यावर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट जनावरे मुख्य रस्त्यावर कळपाने हिंडतात. अंधारात दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.