(रत्नागिरी / वैभव पवार)
कोकण चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने नुकतेच भव्य कोकण व्हिजन २०३० परिषदेचे आयोजन मुंबई शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते. शिवस्वराज्य राज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती निमित्त छत्रपती शिवरायांच्या शिवसंस्कार आणि शिवविचाराच्या प्रेरणेतून संघटित लोकचळवळीचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांनी या परिषदेत दिली. तसेच कोकणातील व महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांना शासकीय अडथळे येऊ नयेत, यासाठी हे ग्रामीण उद्योजकांचे व्यासपीठ आहे. मागील ७५ वर्षात मागे पडलेले कोकण वेगाने विकसित व्हावे, या दृष्टीने या सोहळ्यात समृद्ध कोकण अभियान आणि समृध्द महाराष्ट्र संघटना या राज्यव्यापी संघटनेची देखील घोषणा संजय यादवराव यांनी यावेळी केली. या मिशन मध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती, ग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले.
विशेषतः ग्रामीण भागातील व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी ग्लोबल महाराष्ट्र चेंबर अंतर्गत कोकण चेंबर ऑफ कॉमर्स काम करणार आहे. कोकणातील पर्यटन, हापूस आंबा- काजू- नारळ- चिकू बागायती, मत्स्य उद्योग, फळप्रक्रिया, जलसंवर्धन अशा अनेक मूलभूत विषयात समृद्ध कोकण अभियान गेली २५ वर्ष संजय यादवराव चालवत आहेत. संपूर्ण कोकणात हजारो उद्योजक काम करत आहेत. शेती, पर्यटन, बागायती, उद्योजकता आणि शासकीय योजनांचा लाभ कोकणात सुद्धा झाला पाहिजे, कोकणाच्या ग्रामीण विकासाला दिशा मिळावी, छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आणि शिव संस्कारातून कोकणाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात उद्योजकता चळवळ आणि जलसंवर्धन विषयातील अनेक मान्यवर तज्ञ आणि कार्यकर्ते एकत्र येऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, हा प्रमुख उद्देश या संघटनेचा राहणार आहे. या संघटनेत त्या- त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे अनेक मान्यवर उद्योजक आणि तज्ञ सहभागी होत आहेत.
कोकणात नेहमीप्रमाणे विधानसभेची निवडणूक भावनिक प्रश्नांवर न होता शेती, पर्यटन, मासे, पाणी या मूलभूत विषयांवर व्हावी, याकरता संघटनेच्या वतीने कोकणातील जनतेच्या कोकण विकासाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कोकणच्या मूलभूत प्रश्नांची जाण असलेल्याना समृद्ध महाराष्ट्र संघटनेने उतरवावे अशी जोरदार मागणी उपस्थित उद्योजकांनी केली.
याशिवाय या निमित्ताने ग्लोबल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या व्यावसायिक संघटनेची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत बांबू, इको टुरिझम, मसाला शेती, जलसंवर्धन, पर्यावरण, मत्स्यशेती, मच्छीमार इत्यादी प्रमुख विषयात स्वतंत्र व्यावसायिक संघटना म्हणजेच या चेंबरच्या शाखा निर्माण करीत या सर्व संघटनांचे प्रमुख याच दिवशी घोषित करण्यात आले. समृद्ध कोकण अभियान अंतर्गत कोकण विकासाच्या अनेक विषयात तज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेमध्ये करण्यात आले.
इको टुरिझम या विषयात प्रभाकर सावे, बांबू लागवड या विषयामध्ये मायकल डिसोजा, मधमाशी पालन या विषयात प्रशांत सिता रामचंद्र सावंत, वायनरी उद्योग विषयात माधव महाजन, कोकणातील जलसमृध्दता विषयात राहुल तिवरेकर आदी विविध विषयांत अनेक तज्ञ मार्गदर्शकांनी या परिषदेत मार्गदशन केले. यावेळी मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष एडवोकेट प्रदीप सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, विकास शेत्ये, मंदार जोशी, सचिन दाभोळकर, किरण परब. अनेक मान्यवर व्यक्तिमत्व यावेळी उपस्थित होते. तसेच गणपतीपुळे येथील पर्यटन व्यावसायिक तथा सुप्रसिद्ध पर्यटन गाईड विलास देवरुखकर या परिषदेला उपस्थित होते.
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतला. तसेच श्री जगदीश्वराच्या मंदिरात अभिषेकही करत समृद्ध महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून सुराज्याचा संकल्प करण्यात आला. मराठी माणसाने तलवारीच्या जीवावर देश जिंकला आता व्यापार अन उद्योगाच्या जीवावर देश जिंकायचा आहे, असे आवाहन संजय यादवराव यांनी यावेळी केले.
भव्य कोकण व्हिजन २०३० परिषदेतील प्रमुख मागण्या
पर्यटन पार्क, फूड पार्क, एज्युकेशन हब, आयटी पार्क आदी पर्यावरण पूरक प्रकल्प कोकणात राबविले जाण्यासाठी कोकणाला स्वतंत्र विकास प्राधिकरण आवश्यक आहे. ही मागणी ग्लोबल कोकण मागील १० वर्षणापासून करत होते त्याला शासनाने मंजुरी देखील दिली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाहीये. प्रशासनाने परस्पर सिडकोला कोकण विकसित करण्याचे अधिकार दिले याला आमचा विरोध आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणाला स्वतंत्र विकास प्राधिकरणच आवश्यक आहे. आणि त्या प्राधिकरण मध्ये कोकणातील त्या त्या विषयातील तज्ज्ञांचा सहभाग असावा अशी प्रमुख मागणी संजय यादवराव यांनी या परिषदेवेळी केली.
मागील ७५ वर्ष कोकणावर सातत्याने अन्यायच होत आहे. पर्यटनाचे कुठलेही उद्योग सुरु करायचे असल्यास परवानग्यांसाठी ससेहोलपालट करावी लागते. परवानग्या मिळत नसल्याने पर्यावरण पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी बँका कर्जपुरवठा करत नाही. त्यामुळे नाईलाजाने कोकणात पर्यटन व पर्यावरणावर आधारित व्यवसाय अनधिकृतपणे करावे लागत आहेत. त्यातही शासकीय यंत्रणेकडून चाल केला जात आहे. हे सगळं थांबले पाहिजॆ, अशी प्रमुख मागणी या परिषदेत उपस्थित असलेल्या उद्योजकांनी केली.
कोकणातील पर्यटन, आंबा-काजू- चिकू – नारळ बागायती , मत्स्यव्यवसाय हे प्रमुख तीन उद्योग आहेत. पण या उद्योगांच्या वाढीसाठी मागील ७५ वर्षात कुठलेच सहकार्य कुठल्याही सरकारने केले नाही. महाराष्ट्राच्या उत्पन्नात कोकणाचा हिस्सा ३५ टक्के चा असूनही कोकणावर अन्याय का? असा खडा सवाल यावेळी उद्योजकांनी उपस्थित केला. या तिन्ही विषयांसाठी प्रति विषय १००० कोटी प्रमाणे ३००० कोटीचे बजेट दरवर्षी द्यावे अशी मागणी संजय यादवराव यांनी केली.
ऊस, कापूस, द्राक्ष, दूध या सर्वाना हमीभाव मिळतो पण कोकणातील काजू, सुपारीला हमीभाव नाही. आंबा व्यावसायिक प्रचंड चिंतेत असतानाही आंबा पिकाला कधीच कर्ज माफी मिळत नाही अशी खंत यावेळी खंत बाबा साळवी यांनी व्यक्त केली.