जय जय रघुवीर समर्थ. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे हे चार देह जाण. जागृती, स्वप्न,सुषुप्ती या चार संख्येला पूर्ण करणारे चौथी तुर्यावस्था जाणावी. विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे अभिमान. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनि वसतात. स्थूलभोग, उपाधिरहित भोग, आनंद भोग, आनंदावभासभोग असे हे चारदेहाचे चत्वार भोग आहेत. आकार, उकार, मकर आणि अर्ध मात्रा म्हणजे ईश्वर अशा चार देहांच्या चार मात्रा आहे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्धसत्वगुण असे हे चार देहांचे चत्वार गुण आहेत. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती अशा चार देहांच्या चार शक्ती आहेत. अशी ही बत्तीस तत्वे. स्थूल आणि सूक्ष्म दोन्हीची मिळून ५० होतात. सगळी मिळून ८२ तत्व होतात. त्याच्यामध्ये अज्ञान आणि ज्ञान ही दोन तत्व घातली की ८४ होतात. अशी तत्त्व जाणावी. जाणून ती मायीक आहेत असं ओळखावं आणि आपण साक्षी आहोत हे समजून घ्यावं.
साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञानाने अज्ञान ओळखावे. देहाबरोबर ज्ञान-अज्ञानाचे निरसनकरावे. ब्रम्हांडामध्ये देहाची कल्पना केली, विराट, हिरण्यगर्भ असं त्याला म्हटलं. तेही विवेकाने आत्मज्ञानाद्वारे निरसन केलं. आत्मानात्मविवेक केल्यावर, सारासार विचार पाहिल्यावर पंचभुतांची माईक वार्ता अनुभवाला आली. अस्थी, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. प्रत्यक्ष शरीरामध्ये हे शोधून पाहावे. शुक्लीत, श्वोनीत, लाळ, मुत्र रोम हे पाण्याचे पाच भेद आहेत ते ही तत्त्व समजून जाणून घ्यावे. क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, मैथुन हे पाचही तेजाचे गुण आहे या तत्त्वाचे निरूपण जरूर करावे. चलन, वलन, प्रसारण, विरोध आणि आकुंचन हे पाचही वायूचे गुण आहेत असे श्रोत्यांनी जाणावे. काम क्रोध शोक मोह भय आकाशाचा पर्याय आहे. विचार केल्याशिवाय ते समजणार नाही. असं हे स्थूल शरीर म्हणजे २५ तत्त्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगतो.
अंतकरण, मन,बुद्धी, चित्त, अहंकार हा आकाश पंचकाचा विचार आहे. व्यान उदान समान प्राण आणि अपान असे पाचही गुण वायुतत्त्वाचे आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण हे पाचही तेजाचे गुण आहेत. आता आपण सावध होऊन ऐका. वाचा पाणी पाद शिश्न गुद हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण विषद करतो.शब्द, स्पर्श, रूप, रस गंघ हे पृथ्वीचे गुण आहेत. असे हे सूक्ष्म देहाचे २५ तत्त्वभेद आहेत. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टय नाम समास नवम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
–