( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक २५ जून रोजी अंगारकी यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. या अंगारकी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी १९ जून रोजी रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तर रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिर सभागृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत अंगारकी यात्रोत्सवाचे चोख नियोजन करण्यात आले. या अंगारकी उत्सवाला घाटमाथ्यावरील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, इचलकरंजी, कवठेमहाकाळ, मिरज, कराड ,इस्लामपूर आदी ठिकाणांहून भाविक स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी येतात.
यंदा पावसाळ्यात आलेल्या या अंगारकी यात्रोत्सवाच्या दिवशी जर पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .या पार्श्वभूमीवर संपूर्ण गणपतीपुळे परिसरात येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आयोजित केलेल्या बैठकीत विविध खात्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान समिती, एमटीडीसी, महावितरण, एसटी विभाग, वाहतूक विभाग, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग आदींसह अन्य विविध खात्यांच्या अधिकारी व प्रतिनिधींना सूचना देऊन खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच यंदाची अंगारकी पावसाळी दिवसात आल्याकारणाने या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या व समुद्र स्नानास उतरणाऱ्या सर्वच भाविक व पर्यटकांना खबरदारीच्या सूचना देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे असे बैठकी प्रसंगी सांगण्यात आले आहे.
या दिवशी वॉटर स्पोर्टच्या निमित्ताने गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर कार्यरत राहणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांमधील एक ते दोन बोटी या दिवशी समुद्रात कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी तैनात करण्यात याव्या अशा स्वरूपाची सूचना करण्यात आली आहे. मात्र, या दिवशी समुद्रातील धोक्याची पातळी लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत व अन्य यंत्रणांनी विशेष उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आले आहे . या नियोजनात्मक बैठकीला गणपतीपुळे देवस्थान समितीचे सरपंच डॉक्टर श्रीराम केळकर, सचिव विनायक राऊत, पंच विद्याधर शेंडे, डॉ.अमित मेहेंदळे, निलेश कोल्हटकर आदींसह गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्कये, जयगड पोलीस ठाण्याचे कुलदीप पाटील व विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हा अंगारकी यात्रोत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.