(रत्नागिरी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नव्याने शिक्षक दाखल झाले असले तरीही रिक्त पदांचा प्रश्न जैसे थे आहे. त्यात आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या ३५० शिक्षकांची भर पडणार आहे. सध्या त्या पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे शिक्षकांना त्या सोडण्याचा विषय प्रलंबित आहे; मात्र त्यांना सोडले तर शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १३०० वर पोचणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा शिक्षकांची वानवा जाणवणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासकीय नोकरभरती प्रक्रिया, विकासकामांना ब्रेक लागला आहे. या आचारसंहितेमुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याही थांबल्या आहेत. शिक्षक भरतीनंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या ३५० शिक्षकांची कार्यमुक्तीसाठी धावपळ सुरू होती; मात्र, आचारसंहितेमुळे त्यांच्या आशा मावळल्या आहेत तसेच जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे वाढण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यात आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना थांबावे लागण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे २ हजार होती. त्यामुळे नवीन शिक्षकभरती झाल्याशिवाय शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता.
आचारसंहितेने भरतीप्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. आचारसंहिता सुरू असतानाच शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडून आले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने ९९६ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लवकरच कार्यमुक्त करण्यात येईल, अशी शक्यता होती; पण कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा थांबली. नवीन शिक्षक जिल्ह्यात रूजू झाले असले तरीही जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या सुमारे साडेनऊशे इतकी आहे.