जय जय रघुवीर समर्थ. आत्मा देहामध्ये असतो. नाना सुखदुःख भोगतो शेवटी अचानक शरीर सोडून जातो. शरीरामध्ये तरुणपणी शक्ती असते. नाना सुख प्राणी भोगतो. वृद्धपणी अशक्त झाल्यावर दुःख भोगतो. मरू नये अशी त्याची इच्छा असते. अखेर हातपाय झाडून प्राण सोडतो. वृद्धपणी नाना अवघड दुःखांचा सामना करावा लागतो. देह आणि आत्म्याची संगत असते त्यावेळेस काही प्रमाणात सुख उपभोगायला मिळते. नंतर देहअंताच्या काळी तडफडून जीव जातो. असा आत्मा दुःखदायक असतो. एकाचे प्राण एक घेतो. शेवटी सगळं निरर्थक ठरतं. काहीच उरत नाही. असा दोन दिवसांचा भ्रम त्याला परब्रह्म म्हणतात!
नाना दुःखांचा पसारा वाढवतात. दुःखी होऊन तडफडून गेले तिथे कोणाचेही समाधान झाले नाही. काही दुःख भोगले, थोडेसे सुख भोगले तर बाकीचे सगळे दुःख. जन्मापासून आठवावे म्हणजे लक्षात येईल. किती दुःख मिळाले त्याची मोजदाद कशासाठी करायची? अशी आत्म्याची संगती आहे. नाना दुःख प्राप्त होतात. प्राणीमात्र दीनवाणा होऊन जातो. काही आनंद काही दुःख जन्मभर संबंध पडतो. नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात. झोपेच्या वेळी ढेकूण, पिसवा नाना प्रकारचे त्रास देतात. भोजनाच्या वेळी माशा येतात. नाना पदार्थ उंदीर घेऊन जातात. पुढे त्याची फजिती मांजर करतात. डोक्यातील उवा, त्वचेत घुसणाऱ्या उवा, गोचीड, गांधील माशा, सर्प असा त्रास होतो. त्याच्यावर उपाय केल्या तर त्या प्राण्यांना त्याचा त्रास होतो. विंचू, सर्प, वाघ, अस्वल,सुसरी,लांडगा माणसाला माणसे त्रास देतात. परस्परांना सुख संतोष एकही देत नाही.
८४ लक्ष योनी असतात. एकाला एक भक्षण करतात. नानापिडा, दुखणी किती म्हणून सांगायची? अशी अंतरात्म्याची करणी.. नाना जीव धरणीवर गर्दी करतात.. एकमेकांचा संहार करतात. अखंड रडतात, चरफडतात, तडफडतात प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्याला परब्रम्ह म्हणतात! परब्रम्ह जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही. परब्रह्मामध्ये निंदास्तुती दोन्हीही नाही. उदंड शिव्या दिल्या त्या सर्व अंतरात्म्याला लागल्या. विचार केला तर प्रत्यय आला. धगडीचा, बटकीच्या, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा असा शिव्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा? इतके असूनही परब्रह्माकडे मन लागत नाही. तिथे कल्पना चालत नाही. तिथे असंबध्द ज्ञान उपयोगाचे नाही. सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत. सगळ्यांना वैभव कसे मिळेल? त्यासाठी देवाने योग्य-अयोग्य निर्माण केले. बाजारामध्ये उदंड लोक असतात जे बाजारात आले ते घेतात. भाग्यवान लोक असतात ते उत्तम गोष्टीच घेतात. त्याचप्रकारे अन्न, वस्त्र, तसेच देवतार्चन, त्याच प्रकारे ब्रह्मज्ञान आपल्या नशिबानुसार योग्यतेनुसार घेतात. सगळे लोक सुखी आहोत, असे मानून घेतात. संसार गोड करून घेतात.
महाराजे वैभव भोगतात. ते करंट्या माणसाला कसे मिळेल? मात्र नाना दुःख असतात तिथे सगळे सारखेच! पूर्वी नाना सुख भोगलेली असतात. शेवटी कठीण दुःख सोसवत नाही. प्राण शरीर सोडत नाही. मृत्युचे दुःख सगळ्यांना कासावीस करते. नाना अवयवहीन झाले. तसेच जगत राहिले. प्राणी अंतकाळी कासावीस होऊन गेले. रूप, लावण्य निघून जातं. शरीर सामर्थ्य नष्ट होतं. कुणी संकट येऊन मरतात. अंतकाळ दीन वाईट, सर्वांना समान असतो. असं चंचल अवलक्षण आहे. ते दुःखदायक आहे. काही लोक भोगून अभोक्ता असं म्हणतात ती तर अवघीच फजिती. लोक पाहिल्याशिवाय उगाचच बोलतात. अंतकाळ कठीण आहे. शरीर प्राण सोडत नाही. अंतकाळी केविलवाणे असहाय्य लक्षण पहायला मिळते. असा इशारा समर्थ देत आहेत. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहात्म निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127