(रत्नागिरी)
राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जंगलामध्ये वावरताना दिसतो. त्याची केकारव ऐकण्यासाठी आणि पावसाळ्यातील त्याचा थुई थुई नाच पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. लोकवस्तीत फारसा न दिसणारा मोर गावखडी-पवारवाडीतील शंकर पवार यांच्याकडे मात्र गेली साडेतीन वर्षे येतो आहे. त्यांच्याच कुटुंबात एका सदस्याप्रमाणे तो मिसळून गेला आहे. वाडीतील इतर लोकांनाही त्याचा लळा लागला आहे.
गावखडी येथील शंकर पवार यांच्याकडे गेली साडेतीन वर्षे येणारा मोर याला अपवाद म्हणावा लागेल. गावखडी-पवारवाडी येथे शंकर सखाराम पवार यांच्याबरोबर साडेतीन वर्ष त्यांच्याबरोबर व इतर वाडीतील लोकांबरोबर वावरत आहे. माणसांची भाषा त्याला समजत नसली तरी पवार यांच्या इशाराप्रमाणे तो नाचतो.
याबाबत शंकर पवार म्हणाले, आमचे घर गावखडी पवारवाडी येथे जंगल भागांमध्ये आहे. त्यामुळे अनेक वन्य प्राणी या भागामध्ये वावरत असतात. साडेतीन वर्षांपूर्वी एक मोर आमच्या घरी येऊ लागला. दिवसभर आमच्याबरोबर फिरू लागला. हळूहळू आम्ही सगळ्यांशी मराठीमध्ये बोलत असताना कालांतराने त्याला ते समजू लागले आहे. बोलू शकत नसला तरी आम्ही ज्या गोष्टी त्याच्याशी बोलू त्या गोष्टी तो करू लागला. जसं आपण माणसावर प्रेम करतो आणि तो आपलासा होऊन जातो, त्याप्रमाणे हा मोर कधी आपलासा झाला हे कळलेच नाही. तो आता आमच्या परिवारातला एक सदस्य झाला आहे. तो आमच्या घरात राहत असला तरी आजुबाजूच्या परिसरामध्येही तो फिरत असतो.
दिवसा एकीकडे तर रात्रीचा दुसरीकडे….
मोर कुत्र्याला घाबरतो. ज्याच्या घरी कुत्रा असतो, त्याच्या घराजवळही तो जात नाही. दिवसभर आमच्याबरोबर राहिल्यानंतर रात्रीच्या वेळी वस्तीला नानारकरवाडी येथील हरिश्चंद्र नानारकर यांच्या भागामध्ये राहतो. सकाळ झाली की त्याचा वावर पवार यांच्याबरोबर असतो.