जय जय रघुवीर समर्थ. पावन आणि पतन दोन्ही समान मानलं. निश्चय आणि अनुमान हे ब्रह्मरूप मानले. सगळं ब्रह्मरूप झालं तिथे काय निवडायचं? सगळी साखरच काय कुठे टाकायचं? तसा सार आणि असार सर्व एकंकार झालं तिथे अविचार बळावला विचार कुठला! वंद्य, निंद्य एक झालं, तिथे हाताला काय लागलं? उन्मत्त द्रव्याला भुलले, ते भलतेच बोलायला लागले! त्याप्रमाणे अज्ञानभ्रमास भुलला.. सर्वब्रह्म म्हणून बसला! महापापी आणि भला तो एकच मानतात..
सर्वसंगपरीत्याग आणि अव्वाच्या सव्वा विषयाचे भोग दोन्ही एकच मानले मग काय उरलं? भेद ईश्वर करून गेला. त्याचे वचन मोडले. पण घास काय मुखाऐवजी अपानात घालायचा काय? ज्या इंद्रियांना जे भोग द्यायचे ते यथासांग करतो, ईश्वरांनी जग केले जागतिक राहाटीचे नियम मोडायचे नाहीत. सगळी भ्रांतीची भुताटकी आहे. ती प्रचितीविना खोटी गोष्ट आहे. वेड लागलेले आहे ते भलतच बोलतात. प्रत्यय येणारा असेल तर सावधातेने त्याचं निरूपण ऐकावं म्हणजे आत्मसाक्षात्काराची ताबडतोब ओळख पटते. वेडेवाकडे काय ते जाणावे. आंधळी पावले चालण्यावरून ओळखावी. बाष्कळ बोलणं वमनाप्रमाणे त्यागावे. असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे अनुमान निरसन नाम समास चतुर्थ समाप्त. दशक 17 समास 5 अजपा निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. दिवसाला होणारा एकवीस हजार सहाशे वेळा श्वासोच्छ्वास म्हणजे अजपाजप. विचार करून पाहिला तर सगळं सोपं आहे. मुख आणि नाक याच्यामध्ये प्राण असतो. तो अखंड येत जात असतो. याचा विचार पाहणे याला सूक्ष्मदृष्टी लागते. श्वासाचे मूळ पाहता एक स्वर दिसतो. त्याचा तार स्वर म्हणजे टाळूत जाणवणारा श्वास. मंद्र किंवा मध्य म्हणजे हृदयात जाणवणारा, आणि घोर म्हणजे खालचा स्वर तो नाभीजवळ जाणवतो. त्या घोरापेक्षा सूक्ष्म म्हणजे अजपा जप. सा रे ग म प द नी सा या मातृका म्हणून पाहाव्या. आरोह अवरोहाच्या प्रयत्नाने नाभीपासून वर, हृदयाच्या खाली तेथून स्वराचे जन्मस्थान असल्याचे दिसून येते. प्रथम स्वर मातृका म्हणून पहायचा. एकांतात शांत बसून हे समजून घ्यावे. अखंड श्वास घ्यावे आणि सोडावे. एकांतात मौन धरून बसल्यावर सावधपणे पाहिलं तर कसं भासते? सोहम सोहम असे शब्द येतात. उच्चार केल्याशिवाय जे येतात ते सहज शब्द जाणावे. प्रत्ययाला येतात पण नाद म्हणजे आवाज काहीच येत नाही. ते शब्द सोडल्यावर तोच मी ही जाणीवही विरून गेली म्हणजे त्याला मौनी म्हणावे. योगाभ्यासाचा गल्बला त्यासाठीच असतो. एकांतात मौन धरून बसला, तेथे कोणता शब्द आला? कोहं असा अंतर्यामी भासला.
श्वास घेतल्यावर सो, धरल्यावरती सो सोडल्यावर हम अशा प्रकारे अखंड सोहम सोहम चालते याचा विचार पाहिल्यावरती खूप विस्तार होईल. जितके देहधारक प्राणी आहेत श्वेद्ज, उद्वीज, सर्व श्वास घेतात ते श्वास नसला तर ते कसे जिवंत राहतील? असा अजपाजप सगळ्यांचा चालू असतो परंतु जाणत्यासच समजतो. तो सहज करावा. जास्त सायास करू नयेत. सहजपणे पाहिले तर देव असतोच. सायास केले तर देव फुटतात, नष्ट होतात. नाशवंत देवावर विश्वास ठेवेल असा कोण आहे? जगाचा आणि आपलाही अंतर्यामी जो अंतरात्मा त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग ध्यान सहज अखंड घडत असते. त्याच्या इच्छेप्रमाणे इंद्रिये वागत असतात. आत्म्याचे समाधान घडते तसे भोजन इ भोग होतात. सोडले, फिटले तरी त्यालाच समर्पण हे आपोआप होते. पोटामध्ये अग्नपुरुष वसतो त्याला सगळे लोक आहुती देतात. लोक आत्म्याच्या आज्ञेमध्ये असतात. एकदा असं ताब्यात झालं म्हणजे प्रत्येक क्रिया ही त्याचीच सेवा होते. तिथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. अशी ही मी पण विरहित होत असलेली सेवाच प्रभुला मान्य होते.
सहज देवाचा जप, ध्यान होते, सहज चालणं, स्तुती स्तवन सहज घडतं ते भगवंताला मान्य होतं. हे समजण्यासाठी हटयोग केले जातात. परंतु हे सहज समजत नाही! द्रव्य संपते, दारिद्र्य येते, लक्ष्मी रुसून बसते. प्राणी काय करील सांगता येत नाही.मात्र तळघरामध्ये, भिंतीमध्ये द्रव्य घातलेलं असते, तुळईमध्ये द्रव्य घातलेलं असत.. आपण मध्ये असतो. लक्ष्मीमध्ये करंटा नांदतो! त्याचे दारिद्र्य अधिक दुःखकारक होतं. मात्र या परमपुरुष परमानंदाने नवल केले. एक पाहतात एक खातात अशी विवेकाची गती आहे. प्रवृत्ती अथवा निवृत्ती याचप्रमाणे प्राप्त होत असते. अंतरामध्ये नारायण वस्तीस असल्यावर लक्ष्मीला काय उणे राहील? ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा. परमेश्वराशी अखंड तादात्म्य ठेवावं असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा जप निरुपण नाम समास पंचम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127