(रत्नागिरी)
पावसाळी मासेमारी बंदीकाळ सुरू असताना समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन नौका सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी पकडल्या आहेत. यातील एक पर्ससीन आणि दुसरी मिनी पर्ससीन नौका आहे. यातील एका नौकेचे नाव अरहान, तर दुसऱ्या नौकेचे नाव आयशा असे आहे.
पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून सुरू झाली आहे. या बंदीकाळात यांत्रिकी नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी आहे. तरीही १ जूननंतर पावसाळी मासेमारी करण्यास गेलेल्या दोन नौकांना पकडण्यात आले असल्याचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी सांगितले. यातील एक नौका मिरकरवाड्यातील असून, दुसरी फणसोपची आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५२० नौका असून, त्यातील २ हजार ७४ यांत्रिकी नौका आहेत. या यांत्रिकी नौकांना १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाला जोर नव्हता. त्याचबरोबर वातावरणही चांगले होते. त्यामुळे अनेक नौका पावसाळी बंदीकाळात मासेमारी करण्यास समुद्रात गेल्या होत्या.
यांत्रिकी मासेमारी नौका पावसाळी बंदीकाळात मासेमारी करून बंदरावर येताना, त्या नौकांतील मिळालेली मासळी होड्यांमध्ये टाकून किनाऱ्यावर आणत होत्या. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, बंदी काळात मासेमारी करणाऱ्या पकडलेल्या नौका मालकांविरुद्ध सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे प्रतिवेदन दाखल झाल्यानंतर सुनावणी होऊन कारवाई होईल. सुधारित सागरी मासेमारी कायद्यानुसार, अवैध मासेमारी करणाऱ्या नौका मालकांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.