(लांजा)
लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्या कळसवली राजापूर येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतील मृत तरुणाचे नाव प्रथमेश दत्ताराम तळेकर (२५) असे आहे. तो राजापूर तालुक्यातील कळसवली येथील रहिवासी आहे.
कळसवली राजापूर येथील सात ते आठ तरुण मुंबईहून गावी आले होते. ही तरुण मंडळी वेरवली बेर्डेवाडी धरणाच्या धबधब्याजवळ अंघोळ करत होते. धबधब्यात आंघोळ करताना प्रथमेश हा पाय घसरून धबधब्याखालील जलाशयात बुडाला. उशिरापर्यंत तो पाण्यातून वर न आल्याने इतर तरुणांची धावपळ झाली. सुमारे दोन तासांनी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
या दुर्घटनेनंतर वेरवली बुद्रुक येथील पोलीस पाटील प्रभाकर कुळये यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली. यानंतर लांजा पोलीस निरीक्षक मारुती आटकुडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी 4 वाजता मृतदेह धबधब्याच्या डोहातून बाहेर काढून लांजा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. वेरवली बेर्डेवाडी धरणाचे वाढीव पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याने धबधबा तयार झालेला आहे. हा धबधबा अतिशय धोकादायक आहे. या धधबधब्याकडे न जाण्याचे मनाई आदेश आहेत.
बुडून मृत्यू झालेले तरुणांमधील अन्य तरुणे हे या ठिकाणी मौजमस्ती करत होते असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक श्री. मारुती अटकुटे करत आहेत. वेरवली गावचे पोलीस पाटील आणि सरपंच यांनी येणाऱ्या पर्यटकांना सूचना केली होती की अति उत्साहाच्या भरात जास्त खोल असणाऱ्या पाण्यात पुढे जाऊ नका. मात्र, पर्यटक सूचनेकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या पावसाळा असल्याने धरणाच्या पाण्याचा दाब वाढला आहे. त्यामुळे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.