(मुंबई)
बोरिवली वरून कोकण रेल्वे मार्गावर स्वतंत्र गाडी सुरू करण्याची उत्तर मुंबईतील कोकणवासियांची मागणी आहे. त्यामुळे याबाबत मी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली असून येत्या गणपतीत बोरिवली वरून कोकणासाठी रेल्वे सुरू करण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल रात्री कांदिवलीत केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत या घोषणेचे जोरदार स्वागत केले.
बोरिवली दहिसर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकरांची वस्ती आहे. मात्र त्यांना कोकणात गावी जाण्यासाठी दादर गाठावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बोरिवली येथून विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत आपण केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असल्याचेही ते बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मध्ये उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. उत्तर मुंबईतून ३,५७,६०८ विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर गुरुवारी कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मध्ये त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यां बरोबर पहिला सार्वजनिक संवाद कार्यक्रम दिमाखात पार पडला. उत्तर मुंबईतील महायुतीचा विक्रमी विजय आणि पियुष गोयल यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येचा दुग्ध शर्करा योग साधत उत्तर मुंबई भाजप जिल्हा वतीने प्रभू श्री रामाची मूर्ती आणि पुष्पमाला देऊन केंद्रीय मंत्री गोयल यांचा दिमाखदार सत्कार करण्यात आला.
निवडणुक प्रचारात महायुतीच्या सर्वांचे सहकार्य अत्यंत मोलाचे राहिले आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या विक्रमी विजयासाठी खूप मेहनत घेतली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घरा घरात पोहचवले. तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो अशी साद घालत त्यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, विधानपरिषदेचे गटनेते आ.प्रवीण दरेकर, आ.अतुल भातखळकर, विपस. भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्र संचालन सरचिटणीस निखिल व्यास यांनी केले.