(संगमेश्वर)
गेल्या १७ वर्षांपेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांच्यामुळे कोकणवासीयांचा पावसाळ्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास खडतर बनत आहे. महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात हे काम हाती घेण्यात आल्याने या भागातील रस्ता खचू लागला आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे.
धामणी येथे नदीलगत रस्ता रुंद करण्याच्या हेतूने नदीपात्राचा विचार न करता संरक्षण भिंत उभारण्याचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आले होते. सद्यःस्थितीत या भिंतीचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नसून बाजूने खोदलेला रस्ता आता खचू लागला आहे. संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर हे काम का हाती घेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धामणी येथे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी मातीचे छोटे-छोटे ढिगारे ओतून ठेवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी धामणे येथील नदीलगत मोठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा तोंडावर असताना हे काम हाती घेतल्याने सध्या ते अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी, येथील चालू स्थितीतील रस्ता आता खचू लागला असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नसल्याने हा भाग धोकादायक बनला आहे.