(रत्नागिरी)
फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सांगून दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मेर्वी (ता. रत्नागिरी) येथील एका ७५ वर्षीय वयोवृद्धाला १५ लाखाला गंडा घालण्यात आला. हा प्रकार दि. २७ फेब्रुवारी २०२३ ते २९ जून २०२३ या कालावधीत घडला असून, पूर्णगड सागरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीप्रकरणी समीर वसंत पाध्ये यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजयकुमार आर्या (रा. गंगानगर, ३-वाय राजस्थान), सौरभ चावला (रा. वॉर्ड नं. ५ व्ही. पी. चुनावड, गंगानगर, राजस्थान) आणि राजिंदर कुमार (रा. वर्यम खेडा फजिल्का, पंजाब) या तिघांवर ५ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी समीर पाध्ये यांना ऑनलाइन फॉरेक्स मार्केटमध्ये cappmorefx या कंपनीच्या खात्याच्या वॉलेट पत्त्यावर पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यावर दरमहा १० टक्के परतावा देतो, असे सांगून १५ लाखाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या तिघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे पाध्ये यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानक गाठले.