(संगमेश्वर)
दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याला वळण देणारी परीक्षा. भविष्याचा वेध घेत आयुष्याला आकार देणारी परीक्षा. पण, काही वेळा अघटित घडते आणि ते दुःख बाजूला ठेऊन परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार रांगव कुंभारवाडी येथील जान्हवी आणि तन्वी या कुंभार भगिनींच्या बाबतीत घडला.
दोघी जुळ्या बहिणी कडवई इथल्या भाईशा घोसाळकर हायस्कूलमध्ये शिकत होत्या. मुळातच घराची परिस्थिती बेताची. आई-वडील मोलमजुरी करून घराचा खर्च चालवत होते. आपल्या मुलींनी शिकून ही परिस्थिती बदलावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच कुंभार कुटुंबावर नियतीने घाला घातला. परीक्षा संपण्याकडे आली असताना अचानक वडिलांचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी इतिहासाचा पेपर आणि घरात वडिलांचा मृतदेह अशी अवस्था. पण, दुःख करत बसण्याला वेळ नव्हता. परीक्षेच्या दिवशी सकाळी वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि त्या दोघी आईबरोबर परीक्षा केंद्रावर गेल्या. त्या मनःस्थितीतच दोघींनी उरलेले दोन पेपर दिले.
नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात जान्हवी आणि तन्वी या दोघींनीही यश संपादन केले. जान्हवी आणि तन्वी या जुळ्या बहिणींनी परीक्षेतही जवळपास सारखेच मार्क मिळवत यश संपादन केले आहे. जान्हवीला ५५.४० टक्के तर तन्वीला ५५.६० टक्के गुण मिळाले आहेत. तन्वीला पुढे जाऊन नर्स व्हायचे आहे, तर जान्हवीला कलाक्षेत्रात चित्रकार होऊन करिअर घडवायचे आहे.
दुःखाला अंत नसतो; पण ते बाजूला ठेवलं तर यश मिळवता येतं हेच या बहिणींनी दाखवून दिलं आहे. रांगव गाव आणि घोसाळकर हायस्कूलमधून या दोघींच्या धैर्याचे विशेष कौतुक होत आहे.