(संगमेश्वर)
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांचा वाढदिवस समाजप्रबोधन किर्तनाने पार पडला.वाढदिवसानिमित्त इयत्ता दहावी व बारावीच्या यशवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कोकण बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या पार्थ ब्रीदचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वाढदिवस कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचे कीर्तन! कीर्तनात निरुपणासाठी महाराजांनी गाथेतील ‘कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक,तयाचा हरिख वाटे देवा’ हा अभंग घेतला होता.कीर्तन कार्यक्रमात ज्ञानेश्वर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ बाबासाहेब आंबेडकर असा प्रवास रेखाटला. गोरगरिबांचे राज्य निर्माण करताना शिवाजी महाराजांनी कोणती नैतिकता अंगिकारली होती ते त्यांनी आपल्या कीर्तनातून उलगडून दाखवले.परस्त्रीला आई बहिणींचा दर्जा देणाऱ्या शिवबाने राज्यांच्या पाटलाचा कसा चौरंग केला हे ऐकताना उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी व बांगड्या भरून तिला सन्मानाने परत पाठविणारे शिवराय हिंदूच नव्हे तर मुस्लिम समाजाच्या आदराला पात्र ठरले म्हणून त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैनिक होते हे त्यांनी आपल्या कीर्तनातून मांडले.
‘शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा’असा मौलिक संदेश देणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन किती संघर्षमय होते आणि तरीही त्यांनी साऱ्या विश्वात आपली कशी छाप पाडली हे महाराजांनी सोदाहरण स्पष्ट केले.त्यांनी बाबासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या रामजी बाबा व रमाईचे देखील वर्णन केले.देशाला एक मजबूत अवस्थेत न्यायचा असेल तर तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला.या कीर्तन कार्यक्रमाला साथ देण्यासाठी संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठया प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी महाराजांना साथ देण्यासाठी युवा गायक प्रितेश कदम ,रितेश भोसले,उमेश शिंदे उपस्थित होते .मृदुंगमणी म्हणून प्रमोद पालकर व गौरव मेंगाणे यांनी काम केले.
रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून नमन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या हौशी कलाकार नमन मंडळ, गोळवली यांचे नमन सादरीकरण झाले.संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातून हजारो शुभचिंतक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कुवळेकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष थेराडे मित्र परिवाराने मेहनत घेतली.