(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे बावनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले दोघेजण बुडल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती. काल त्यांचा शोध घेऊनही मृतदेह हाती न लागल्याने आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी दोघांचेही मृतदेह ग्रामस्थांच्या हाती लागले आहेत. परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे ( वय ३५ वर्ष ) , संकेत सहदेव कळंबटे ( वय १२ वर्ष ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
परचुरी येथील बावनदी मध्ये शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान 7 जण पोहायला गेले होते. त्यातील एक 12 वर्षाचा मुलगा सहदेव बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रमोद कळंबटे हे पाण्यात उतरले मात्र त्यांच्या ही बुडून मृत्यू झाला. काल रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी होडीच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली. रविवारी सकाळी (आज) ९ वाजण्याच्या सुमारास प्रमोद कळंबटे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर १०.१५ वाजता सुमारास संकेत याचाही मृतदेह दिसून आलं. त्या दोघांचे मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसानी शोध मोहीम राबवली. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सचिन कामेरकर , प्रशांत शिंदे , उशांत देशमवाड उपस्थित होते .