(रत्नागिरी)
रत्नागिरीकरांची आजू टेक्सोल कंपनीने फसवणूक केली. यानंतर आता पुन्हा एका कंपनीने गंडा घातल्याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक व्यावसायिकांकडून पिग्मी गोळा करणाऱ्या ‘महामुंबई’तील एका कंपनीने लाखो रुपयांना चुना लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेले चार-पाच दिवस या कंपनीचे कार्यालय बंद असून, कर्मचारी आणि संचालकांचेही फोन ‘नॉट रिचेबल’ येऊ लागल्याने, पिग्मीधारक अडचणीत आले आहेत.
रत्नागिरीकरांना गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी लुबडल्याच्या घटना समोर असतानाही जादा रकमेच्या मोबदल्यापोटी गुंतवणूक होऊन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रत्नागिरीत वर्ष-दीड वर्षापूर्वीच आलेल्या महामुंबईतील एका कंपनीने येथील स्थानिक छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांकडून पिग्मी स्वरुपात नियमित रक्कम गोळा करण्यास सुरुवात केली. अनेक व्यावसायिकांनी बचत होईल, या उद्देशाने पिग्मीही सुरु केली. पिम्मी गोळा करणाऱ्या एजंटने पिग्मीचे प्रमाण वाढवावे म्हणून चांगले काम करणाऱ्यांना देशांतर्गत अनेक मोठ्या शहरांचे विमानप्रवासही घडवून आणले. त्यामुळे पिग्मी एजंटनी अनेक व्यापाऱ्यांना पिग्मीसाठी तयार करुन, नियमित पिग्मी सुरु केली होती. दिवसाची लाखो रुपयाची रक्कम यातून गोळा होत होती. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून पिग्म्मीची मुदत झालेल्यांना पैसे परत देण्यास या कंपनीकडून टाळाटाळ सुरु झाली होती. काहींचे धनादेशही परत आल्याने, त्यांनीही पैसे मिळवण्यासाठी पाठपुरवठा सुरु केला होता. त्यानंतरही ही पिग्मी गेले काही महिने सुरु राहिली. परंतु मागील पाचसहा दिवसांपासून या कंपनीचे कार्यालय बंद आहे. शहरातील साळवीस्टॉप परिसरात हे कार्यालय असून, त्याचे भाडेही थकवले गेले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
दागिने गहाण ठेवून पिग्मीची रक्कम अदा
व्यापाऱ्यांनी पिग्मी एजंटकडे पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर काहींनी घरातील दागिने ठेवून पिग्मीची काही रक्कमही दिल्याचे बोलले जात आहे; परंतु नवी मुंबईत असणाऱ्या या कार्यालयात जाणाऱ्या एजंटांनाही आता तेथील कार्यालय बंद असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे या कंपनीने गाशा गुंडाळल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये असून, तेही आता हवालदिल झाले आहेत.