जय जय रघुवीर समर्थ. मुंगीपासून मोठी होत जाणारी लहान मोठी शरीरे चढती, वाढती असतात. अभ्यास केला तर त्याची माहिती मिळू शकते. नानावर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग. एक चांगले एक वाईट किती म्हणून सांगायचे? काही सुंदर असतात काही कठोर असतात अशी शरीरे जगदीश्वरांनी निर्माण केलेली आहेत. काही सुवर्णसारखी देदिप्यमान शरीर असतात. शरीराचा भेद, आहाराचा भेद, वाचेचा भेद, गुणाचा भेद, अंतरामध्ये मात्र अंतरात्मा एकच वास करतो. काही त्रासदायक, काही पाहिल्यावर कौतुकास्पद. काही अमूल्य असे सृष्टीमधले जीव वाटतात. असे सगळे पाहिल्यानंतर असा प्राणी कोण आहे तो आपल्यापुरतं किंचितही जाणून राहत नाही?
वसुंधरा ही नवखंडांची आहे. तिला सप्तसागरांचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेरची जी निरा म्हणजे निराळे विश्व आहे ते कोण पाहते? त्या निरामध्ये जीव असतात. पाहिले तर असंख्य जीव आहेत. त्या विशाल जीवांची स्थिती कोणाला माहिती आहे? जिथे पाणी आहे तिथे जीव आहे हा उत्पत्तीचा स्वभाव आहे. हे मत सगळ्यांना मान्य आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये नाना प्रकारचं पाणी आहे. त्या पाण्यामध्ये शरीर आहेत. लहान थोर असे जीव आहेत. हे कोणाला माहिती आहे? काही प्राणी अंतरिक्षामध्ये असतात ते देखील डोळ्यांना दिसत नाहीत. पंख फुटल्यानंतर ते वरच्या वर उडून जातात. अशा प्रकारचे खेचर आणि भूचर, वनचर आणि जळाचर ८४ लक्ष योनीचे प्रकार आहेत. ते कोणाला माहिती आहेत? उष्ण तेज वेगळे करून जीथे तिथे जीवयोनी आहेत.
कल्पनेपासून ते प्राणी तयार होतात की काय ते कोणाला माहिती आहे. एका नाना सामर्थ्यामुळे निर्माण झाले, काही इच्छेपासून झाले, काही शब्दांमुळे श्वापदांच्या देहात आले. काही देह जादुगिरीमुळे झाले, काही राक्षसी देह, काही देवतांचे देह असे नाना प्रकारचे देह आहेत. काही क्रोधापासून झाले, काही तपापासून जन्माला आले. काही उ:शापामुळे पूर्वीच्या देहात आले. असं भगवंताचे जे करणे आहे ते किती म्हणून सांगायचं? विचित्र अशा मायेच्या गुणामुळे सगळं होत जातं. ही नाना अवघड करणी केलेली आहे. ती कोणी पाहिलीही नाही आणि ऐकलिही नाही. ही विचित्र कला समजून घेतली पाहिजे. त्याच्यातलं थोडं बहुत समजलं. पोटापुरती विद्या शिकले. तरीदेखील हे प्राणी मी शहाणा, मी जाणकार म्हणून उगाच गर्व करीत राहतात. अंतरात्मा हा एकच ज्ञानी आहे. सर्वांमध्ये तो सर्वात्मा आहे त्याचा महिमा समजण्यासाठी बुद्धी काहींना नसते.
पंचमहाभूते अहंकार आणि महत्त्व या सात वेष्टनाचे ब्रह्मांड आहे. त्याच्यामध्ये या सात विषयांचा पिंड आहे. त्या पिंडामध्ये उदंड प्राणी आहेत. अरे, आपल्या देहातीलच कळत नाही तर मग बाहेरचं सर्व कसं काय सगळं समजणार? अल्प ज्ञानामुळे लोक उतावळे होतात आणि रेणू इतके क्षुद्र प्राणी त्यांचे आम्ही विराट पुरुष! त्यांच्या तुलनेत आमचे उदंड आयुष्य आहे. त्यांचे नियम, त्यांच्या रीती त्यांचे दंडक त्यांच्या अनेक नियम असतील त्याचं कौतुक आहे. परमेश्वराची करणी धन्य आहे. तिचं मनाला अनुमान करता येत नाही. उगाचच अहंकाररुपी पापीणी वेढा घालते. माणसाने अहंकार सोडून वावरावं पाहिले तर माणसाचे जीवन थोडे आहे. माणसाचा आयुष्य त्याच्यापुढे खूप थोडं आहे. थोडं जीवन, क्षणभंगुर काया. गर्व करतात. रडायला येतं. सगळ शरीर पडायला वेळ लागत नाही. घाणेरड्या ठिकाणी जन्माला आले आणि घाणेरड्या रसामध्ये वाढले आणि त्यालाच ते थोर कोणत्या हिशेबाने म्हणतात? घाणेरडे आणि क्षणभंगुर, अखंड व्यथा आणि चिंताततूर आणि त्याला लोक उगचपणे थोर असं वेडेपणाने म्हणतात.
काया आणि माया दोन दिवसांची आहे. जन्म आणि मृत्यूच्या समयी सगळे अस्वच्छपण आहे. वस्त्राधिकांनी देहाला नटवून उगीच मोठेपणा दाखवतात. झाकलं तरी दुर्गुण उघडे पडतातच. दुर्गंधी सुटते. जिकडेतिकडे अपकीर्ती होते.जो कोणी विवेकाने वागतो, विचारपूर्वक राहतो तो धन्य आहे म्हणून उगीच कशासाठी भांडण करायचं? अहंकाराची गुंडगिरी मोडून काढा. विचारपूर्वक देवाचा शोध घ्यावा हे उत्तमातील उत्तम आहे असा उपदेश समर्थ करीत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास अष्टम् समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127